बॉलिवूडचा ‘बाजीराव’ अर्थात अभिनेता रणवीर सिंगला दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ‘पद्मावत’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जाणार आहे. या चित्रपटात त्याने अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारली होती. दादासाहेब फाळके एक्सिलन्स अवॉर्ड समितीतर्फे हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ या बहुचर्चित चित्रपटात त्याने साकारलेल्या अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली असून ३०० कोटींचा गल्ला जमावणारा हा रणवीरचा पहिला चित्रपट ठरला आहे.

प्रेक्षक- समीक्षकांकडून रणवीरने साकारलेल्या भूमिकेची बरीच प्रशंसा झाली. नजरेत सूडाग्नीचा दाह असणारा अलाउद्दीन साकारण्यासाठी रणवीरनेही कठोर मेहनत घेतली होती. इतकंच नाही तर चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर रणवीरला या भूमिकेतून बाहेर येण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदतही घ्यावी लागली होती. विक्षिप्त भूमिका साकारण्यासाठी त्याने स्वत:ला झोकून दिले होते.

रणवीर सिंगसोबतच अभिनेत्री अनुष्का शर्मालाही दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.