बॉलिवुड सुपरस्टार रणवीर सिंग नेहमी त्याच्या अनोख्या ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असतो. पण सध्या तो एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. या चर्चा रणवीरने मराठी व्यक्तिरेखा साकारल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

एका विनोदी जाहिरातीत रणवीरने मराठी व्यावसायिकाची भूमिका साकारली आहे. बायको फेकून मारत असलेली भांडी तो चुकवतोय, असं यात दाखवण्यात आले आहे. ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

संपूर्ण ऑर्डर विकली गेल्यानंतर मित्रांसोबत रात्रभर गच्चीवर सेलिब्रेट केल्यानंतर बायकोची क्षमा मागताना रणवीर या जाहिरात मराठी बोलतो. तो म्हणतो, “अरे काय करतेस तू, सॉरी म्हणतो ना.” रणवीरचे हे मराठी बोलणे चाहत्यांना विशेष आवडत असल्याचे दिसत आहे. ‘सिम्बा’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ अशा दोन बॉक्स ऑफिस ब्लॉकब्लस्टर सिनेमात रणवीरने यापूर्वी मराठी व्यक्तिरेखा साकारली होती.

रणवीर लवकरच ‘८३’ या चित्रपटात दिसणार आहे. पण करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.