अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहे. अनेक कलाकारांनी स्वत:हून पुढे येत या गटबाजी विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान अभिनेता रणवीर शौरी याने देखील मनातील खदखद व्यक्त करत निर्माता महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबियांवर निशाणा साधला आहे. भट्ट कुटुंबीयांनी माझं करिअर संपवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता, असा खळबळजनक आरोप त्याने केला आहे.

अवश्य पाहा – सुशांत आत्महत्या प्रकरण: करणवर आरोप करताना कंगनाने आदित्य ठाकरेंचाही केला उल्लेख

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने बॉलिवूड सिनेसृष्टीतील गटबाजीवर भाष्य केलं. यावेळी स्वत:चे काही अनुभव सांगताना त्याने भट्ट कुटुंबावर टीका केली. “बॉलिवूड सिनेउद्योग हा घराणेशाही, गटबाजी आणि मक्तेदारीमुळे पोखरला आहे. जर त्यांच्या मनासारखं काही झालं नाही तर नव्या कलाकारांना ही मंडळी संपवून टाकतात. हा अनुभव मी देखील घेतला आहे. २००३ ते २००५ या दोन वर्षात मला प्रचंड त्रास सहन करावा लागला. भट्ट कुटुंबीयांनी माझ्या विरोधात अनेक अफवा पसरवल्या होत्या. मी मद्यपी आहे, उद्धट आहे, दिग्दर्शकांना शिव्या घालतो अशा अनेक खोट्या बातम्या त्यांनी पद्धतशीरपणे पसरवल्या. ही मंडळी इतकी शक्तीशाली आहेत की ज्यांच्याविरोधात मी काहीही करु शकत नव्हतो, अन् या गोष्टीचा त्रास मला जास्त होत होता. त्यावेळी मी देश सोडून जाण्याचाही विचार करत होतो. पण कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या मदतीने मी स्वत:ला सावरलं. परिणामी आजही मी या क्षेत्रात कार्यरत आहे.” असा अनुभव रणवीर शौरीने सांगितला. यापूर्वी देखील त्याने असंच काहीसं ट्विट करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती.

अवश्य पाहा – टायगरच्या बहिणीनं मादक अदांनी अनेकांना केलं घायाळ; सेलिब्रिटीही झाले फिदा

रणवीर शौरी बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेता आहे. २००२ मध्ये ‘एक छोटीसी लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून रणवीरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘खोसला का घोसला’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि.’, ‘भेजा फ्राय’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘मिथ्या’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.