‘अलीकडच्या काळात मुलींवरील बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब असली तरी सध्या अशा घटनांना  जास्तच प्रसिद्धी दिली जात आहे. कदाचित पूर्वीही बलात्काराच्या अशाच घटना घडूनही त्या इतक्या प्रकाशझोतात आल्या नाहीत’, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या खासदार हेमामालिनी यांनी केले आहे.

मथुरा येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या हेमामालिनी यांना बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत विचारले असता त्यांनी त्यावर चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले, की ‘बलात्काराच्या ज्या घटना घडत आहेत, त्यांना आळा घालणे आवश्यक आहे, कारण अशा घटनांनी देशाचे नाव बदनाम होत आहे, पण बलात्काराच्या घटनांना प्रमाणापेक्षा अधिक प्रसिद्धी दिली जात आहे असे मला वाटते.’

कथुआ, उन्नाव, सुरतनंतर मध्य प्रदेशात इंदूर येथेही बालिकेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने सर्वत्र संताप असताना हेमामालिनी यांचे वक्तव्य हे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.

मध्य प्रदेश, आसाम, उत्तर प्रदेशात मुलींवर बलात्कार

देशात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे सत्र सुरूच असून मध्य प्रदेश, आसाम व उत्तर प्रदेशात अशा तीन घटना घडल्या आहेत. मध्य प्रदेशच्या इंदोर शहरात अवघ्या चार महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली आहे. या मुलीचा मृतदेह आदल्या दिवशी सापडला होता.

इंदोरच्या एका व्यावसायिक इमारतीच्या तळमजल्यात शुक्रवारी ४ महिन्यांचा मुलीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या गुन्ह्य़ाच्या संबंधात ३-४ संशयितांना ताब्यात घेऊन सुनील भील (२१) हा मुख्य संशयित असल्याचे जाहीर केले होते. मात्र मुलीच्या आईचा चुलतभाऊ नवीन गाडगे (२५) हा या गुन्ह्य़ातील आरोपी असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक एच. सी. मिश्रा यांनी आज पत्रकारांना दिली.

गाडगे याची पत्नी काही दिवसांपूर्वी त्याच्यापासून विभक्त झाली होती. गुरुवारी रात्री तो मुलीच्या आईकडे गेला आणि आपल्या पत्नीला आपल्याकडे येण्यास राजी करावे अशी विनंती तिला केली. मात्र त्यांच्यात भांडण होऊन त्याला निघून जाण्यास सांगण्यात आले.शुक्रवारी सकाळी गाडगे त्यांच्या घरी आला व हे कुटुंब झोपेत असताना त्यांच्या तान्ह्या मुलीचे अपहरण केले. तेथून जवळच असलेल्या व्यावसायिक इमारतीच्या तळघरात तिच्यावर अत्याचार केला व नंतर तिला उंचावरून फेकून दिले. यात ही मुलगी मरण पावली.

आसामच्या तिनसुकिया जिल्ह्य़ातील लाजोंग खेडय़ात एका मध्यमवयीन इसमाने सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. मुलीच्या वडिलांनी शुक्रवारी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, त्यांचा शेजारी ऐनुल हक (५५) याने काही दिवसांपूर्वी या मुलीला तिच्या घराबाहेर बोलावून तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या आईने ही बाब त्यांना शुक्रवारी सायंकाळी सांगितल्यानंतर शेजाऱ्यांनी हक याला पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. उत्तर प्रदेशच्या कौशंबी जिल्ह्य़ात १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्य़ाच्या एका खेडय़ातील या मुलीला एका महिलेने आमिष दाखवून निर्जन स्थळी नेले आणि दोन तरुणांच्या ताब्यात दिले. या तरुणांनी शुक्रवारी तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीच्या कुटुंबाने नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला. या प्रकरणी बबलू प्रजापती, भैया व सविता प्रजापती या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रतापकुमार गुप्ता यांनी दिली.