अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांची कार्यपद्धती, घेतलेले निर्णय, निवडणुकीदरम्यान केली गेलेली फेसबुक हॅकिंग यांसारख्या अनेक प्रकरणांमुळे समाजातील सर्वच स्तरातून टीकेची लाट उसळली आहे. वृत्तमाध्यमांबरोबरच आता जिम्मी किम्मेल, लेडी गागा, जे. के. रोलिंग, स्टिव्हन स्पिलबर्ग यांसारख्या अनेक कलाकारांनी ट्रम्पवर मुक्त कंठाने आक्रमक हल्ला सुरू केला. आणि या यादीत आता कार्डी बी हे आणखीन एक नाव जोडले जात आहे. समाजमाध्यमांवर २१ दशलक्षपेक्षा जास्त फॉलोअर्स बाळगणाऱ्या आघाडीच्या रॅपर संगीतकारांपैकी एक असलेल्या कार्डी बीने अमेरिकन करपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कार्डी आपल्या एकूण उत्पादनावर ४० टक्के कर भरते. सध्या ती अमेरिकेतील सर्वाधिक कर भरणाऱ्या नागरिकांपैकी एक आहे. त्यामुळे करांच्या स्वरूपात तिने सरकारला सुपूर्द केलेल्या पैशांचे नेमके काय होते? हे जाणून घेण्याची तिची इच्छा आहे. परंतु तिच्या प्रश्नांवर कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने तिला अपेक्षित उत्तर न दिल्यामुळे वृत्तमाध्यमांमार्फत तिने सरकारवर आता थेट निशाणा साधायला सुरुवात केली आहे. अमेरिका हा जगातील सर्वात श्रीमंत व सुखी देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. येथे कायदा सुव्यवस्था व नागरी सोयीसुविधा अव्वल दर्जाच्या आहेत, परंतु कार्डी बीच्या मते अमेरिकेने जगासमोर उभे केलेले हे रूप खोटे आहे.

अमेरिकन प्रशासन हे इतर विकसनशील देशांप्रमाणेच भ्रष्टाचाराने पोखरले आहे. प्रत्येक वस्तूवर भरमसाट कर आकारले जातात, परंतु करस्वरूपात जमा केलेल्या पैशांचे नेमके होते काय? याचे उत्तर करदात्यांना दिले जात नाही. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेतील स्वच्छता व सुरक्षेचे दाखले जगभरात देतात. पण येथील वस्तुस्थिती भिन्न आहे. न्यू यॉर्क, वॉशिंग्टन, शिकागो ही अमेरिकेतील सर्वात अस्वच्छ  शहरे आहेत. येथे रस्त्यांवर सर्रास कचरा टाकला जातो. सफाई कर्मचारी आपले काम योग्य प्रकारे करत नाहीत. या देशात गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे की सहज गार्डनमध्ये मॉर्निग वॉकला फिरावे तसे दहशतवादी येथे फिरतात आणि हल्ले करतात, परंतु प्रशासन मूग गिळून गप्प आहे, अशी टीका तिने केली आहे. कार्डी ही देशातील प्रामाणिक करदाती आहे. कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला जर आर्थिक मदत केली तर त्या पैशांचे त्यांनी नेमके काय केले याचे सविस्तर उत्तर दिले जाते. त्याचप्रमाणे प्रशासनानेदेखील उत्तर देणे अनिवार्य आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी आलंकारिक दूषणे देत कार्डीने प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे.