प्रसिद्ध रॅपर फॉन्ट्रेल अँटॉनिओ याला आर्थिक फसवणूकीच्या आरोपाखाली अटक झाली आहे. अमेरिकेतील एका रोजगार योजनेत त्याने तब्बल आठ कोटी ८० लाख रुपयांचा घोटाळा केला आहे. अलिकडेच एका ड्रग्ज प्रकरणात त्याचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणी चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्यांना काही खोटी कागदपत्र आणि जवळपास आठ डेबिट कार्ड सापडली. या कागदपत्रांची चौकशी सुरु असताना फॉन्ट्रेलचा हा नवा घोटाळा समोर आला आहे.

अवश्य पाहा – “हा व्हिडीओ स्वत:च्या रिस्कवर पाहा”; ढिंच्यॅक पूजा नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल

नेमकं प्रकरण काय आहे?

भारतातील मनरेगा प्रमाणेच अमेरिकेत देखील एक रोजगार योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि बेरोजगार लोकांना प्रत्येक महिन्याला काही ठराविक रक्कम पोटा-पाण्यासाठी दिली जाते. फॉन्ट्रेलने या योजनेत घोटाळा करुन कोट्यवधी रुपये लंपास केले असा आरोप त्याच्यावर केला जात आहे. त्याने खोट्या कागदपत्रांचा वापर करुन वेगवेगळ्या नावानं सरकारकडून जवळपास ८ कोटी ८० लाख रुपये मिळवले आहेत. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून लॉस एंजलिसमधील पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. जर हा आरोप सिद्ध झाला तर फॉन्ट्रेलला २२ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.