भारत हा विकसनशील देश असला तरी आजही या देशातील काही खेडेगांवामध्ये प्राथमिक सेवा-सुविधांचा अभाव आहे. अशा काही खेड्यांमध्ये मदतीचा हात देण्यासाठी बरेच मंत्री, कलाकार घोषणा करतात, त्यातील काहीजण मदतीचा हात पुढेही करतात. पण, बऱ्याचदा त्या गावांचं काम प्रगतीपथावर आहे का, तिथे सर्व सोयीसुविधा नीट पुरवल्या जात आहेत की नाही, याकडे मात्र कुणीही लक्ष देत नाही. पण, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध रॅपर निकी मिनाज याला अपवाद ठरत आहे.

निकीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमधून हा खुलासा झाला आहे की ती भारतातील एका खेडेगावाला अर्थिक मदत करत होती. याची वाच्यता निकीने आजवर कधीही केली नव्हती. पण, त्या खेडेगावाची बदललेली परिस्थिती सर्वांसमोर आणण्यासाठी तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. निकीने त्या गावाचं नाव सांगितलेलं नाही. पण, सध्या तिची सर्वच स्तरांतून प्रशंसा करण्यात येत आहे. निकी आर्थिक मदत देऊ करत असलेल्या त्या गावामध्ये सध्याच्या घडीला कॉम्प्युटर सेंटर, टेलरिंग इन्स्टिट्यूट या सुविधांसोबतच पिण्याच्या पाण्याच्याही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

निकीने या गावच्या वाटचालीबद्दल लिहिताना सांगितलं की, ‘अशा प्रकारच्या गोष्टींचा मला फार अभिमान आहे. भारतातील ज्या खेडेगावाला मी गेल्या दोन वर्षांपासून मदत करते आहे, त्या खेडेगावात आज कॉम्प्युटर सेंटर, टेलरिंग इन्स्टिट्यूट, रिडिंग प्रोग्राम या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आपण नेहमीच लहानसहान गोष्टींबद्दल तक्रार करत असतो. काही लोक मात्र तेही करत नाहीत.’ निकीने यासोबतच इतरांनाही मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलं आहे.

https://www.instagram.com/p/BUVLfbnBAub/

निकी मिनाजने उचललेलं हे पाऊल आणि तिचा या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन पाहता अनेकांनीच तिचा आदर्श घ्यायला हवा, असं मत सध्या विविध स्तरांतून मांडलं जात आहे. मनोरंजन आणि ग्लॅमर जगतातून नावारुपास आल्यानंतर निकीने उचललेलं हे पाऊल प्रशंसनीय ठरत आहे.

https://www.instagram.com/p/BUVMMxPBdjI/