‘बेण्ड इट लाइक बेकहॅम’ चित्रपटाची दिग्दर्शिका गुरिन्दर चढ्ढाने पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीची मान अभिमानाने उंच केली आहे. ‘ग्रेट ब्रिटिश फिल्म स्पेशल स्टॅम्प इशु’द्वारे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्टॅम्पसाठी इंग्लंडमध्ये फुटबॉल क्षेत्रात कारकीर्द करण्याचे ठरविलेल्या भारतीय वंशाच्या मुलीची कथा असलेल्या ‘बेण्ड इट लाइक बेकहॅम’ या प्रसिद्ध चित्रपटाची निवड झाली आहे. गुरिन्दरच्या चित्रपटाबरोबर अ मॅटर ऑफ लाइफ अॅण्ड डेथ (१९४६), लॉरेन्स ऑफ अरेबिया (१९६२), २००१: अ स्पेस ऑडिसी (१९६८), चारिऑटस् ऑफ फायर (१९८१), सिक्रेटस् अॅण्ड लाइज (१९९६), अ कलर बॉक्स (१९३५), दी नाईट मेल (१९३६), लव्ह ऑन दी विंग (१९३८), स्पेअर टाईम (१९३९) या जगभरात वाखाणलेल्या चित्रपटांच्या प्रित्यर्थ स्टॅम्प जारी करून ब्रिटिश सरकारद्वारे सन्मान करण्यात येणार आहे. भारतीय दिग्दर्शकाच्या चित्रपटाची अन्य उत्कृष्ट ब्रिटिश चित्रपटांबरोबर अशा प्रकारच्या सन्मानासाठी निवड होणे, ही बाब भारतासाठी आणि जगभरात प्रभाव टाकणाऱ्या अनेक भारतीय चित्रपटकर्त्यांसाठी अतिशय मानाची आहे. याविषयी बोलताना गुरिन्द्रर चढ्ढा म्हणाल्या, हे आनंददायी आहे! अनेकांनी दिलेल्या शुभसंदेशांनी माझे टि्वटर अकाऊन्ट भरून गेले आहे! माझ्या चित्रपटामुळे या देशातील वर्णद्वेशाबाबत सकारात्मक बदल झाल्याचा माला विश्वास आहे. या पुरस्कारासाठी माझी निवड होणे हा याचाच पुरावा आहे. सध्या गुरिन्द्रर ‘बेण्ड इट लाइक बेकहॅम’ वर आधारित संगीताच्या कामात व्यग्र आहे.