असिफ बागवान

अ‍ॅडल्ट कॉमेडी अर्थात फक्त प्रौढांसाठी तयार करण्यात आलेल्या विनोदी चित्रपटांची संख्या आपल्याकडे तशी मर्यादितच आहे. मस्ती, क्या कूल है हम यांसारख्या काही चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर अ‍ॅडल्ट कॉमेडी आणण्याचे प्रयत्न झाले. यातील काही प्रयत्न तिकीटबारीवर यशस्वीही झाले. मात्र, त्यातील कलात्मक आणि विनोदाचा दर्जा अतिशय सुमार होता. चावट किंवा द्वयर्थी संवादांतूनच प्रौढांसाठीचे विनोदी चित्रपट बनतात, असा एक साचा या चित्रपटांच्या निर्मात्यांनी तयार केला आणि त्यातूनच मस्ती, ग्रँड मस्ती, ग्रेट ग्रँड मस्ती यांसारखे बाष्कळ विनोदाचे अवतार समोर आले. विनोदाचा असाच साचा वापरून सध्या ओटीटी फलाटांवर फक्त प्रौढांसाठीच्या मालिका तयार करण्यात येतात. एकदोन ओटीटी वाहिन्या तर केवळ प्रौढांसाठी तयार केलेल्या फुटकळ आशयाच्या मालिका आणि चित्रपटांच्या जीवावरच तग धरून आहेत. अशा परिस्थितीत अ‍ॅमेझॉन प्राइमवरून प्रदर्शित झालेली ‘रसभरी’ आपल्याला अ‍ॅडल्ट कॉमेडीचा ताजा तडका देऊन जाते.

मुले पौगंडावस्थेत पोहोचतात, तसतसे त्यांच्यातील लैंगिक कुतूहल चाळवू लागते. मात्र, या विषयाबद्दल समाजात उघडपणे बोलण्यास कुणीही तयार नसल्याने त्याविषयीच्या गोष्टींची, चित्रांची पुस्तके, चित्रपट किंवा मित्रमंडळींतील गप्पा यातून मुलं हे कुतूहल शमवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी सहाजिकच दिशा चुकून ती भरकटण्याची शक्यता अधिक असते किंवा लैंगिक आकर्षणाबद्दलचे ती स्वत:च वेगळे ठोकताळे बांधू लागतात. हाच धागा पकडून ‘रसभरी’ आपल्यासमोर प्रकट होते. मेरठसारख्या एका छोटय़ा शहराच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये शानू बन्सल (स्वरा भास्कर) ही इंग्रजी शिकवणारी नवी शिक्षिका रुजू होते. शानू मॅडमचं रूप, पेहराव, केशभूषा यामुळे कॉलेजमध्ये शिकणारे, शिकवणारेच काय पण शहरातल्या अनेक जणांचं हृदय घायाळ होतं. यात तिचा विद्यार्थी नंदकिशोर त्यागी (आयुषमान सक्सेना) हादेखील आहे. शानूला पाहताक्षणी नंदकिशोर तिच्याकडे आकर्षित होतो आणि तिच्याशी जवळीक वाढवण्याची स्वप्नं पाहू लागतो. याचदरम्यान शानूविषयी शहरभर रसभरीत चर्चा सुरू होते. पती दिवसेंदिवस नोकरीनिमित्त बाहेरगावी जात असल्याने शानू शहरातील कोणत्याही पुरुषाशी लगट करते, याची वर्णनं शहरात चवीन चघळली जाऊ लागतात. सहाजिकच शहरातील अनेक जण तिच्या मागे लागतात. याचा सुगावा या मंडळींच्या सौभाग्यवतींनाही लागतो आणि शानूला अद्दल घडवण्याच्या योजना त्या आखू लागतात. इकडे नंदकिशोरचेही प्रयत्न सुरूच असतात. यातूनच त्याला नवीनच गोष्ट समजते, त्यातून शानूकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. ती गोष्ट काय आणि त्यातून पुढे काय काय घडतं, हे प्रत्यक्ष पाहणंच अधिक रंजक ठरेल.

शंतनू श्रीवास्तव यांच्या लेखणीतून साकारलेल्या आणि निखिल भट यांनी दिग्दर्शित केलेली ‘रसभरी’ ही वेबसीरिज केवळ मनोरंजन करत नाही तर, त्यातून भारतीय समाजातील काही दृष्टिकोन आणि विचार यांच्यावर भाष्यही करते. लैंगिक विषयांबद्दल उघडपणे बोलणं म्हणजे पाप हा विचार अजूनही समाजातून पुसला गेलेला नाही. त्याच वेळी त्या विषयावर दबक्या आवाजात मनसोक्त चर्चा (अगदी महिलावर्गातही) करणं मात्र, मान्य आहे. एखादी सुंदर, आकर्षक पेहराव करणारी स्त्री म्हणजे बाहेरख्यालीच आणि तिच्यामागे पुरुष लागले तरी दोष त्या स्त्रीचाच असा समज समाजात कायम आहे. या प्रवृत्तींवरही रसभरी अप्रत्यक्षणे प्रहार करते. त्यामुळे ही वेबसीरिज अ‍ॅडल्ट कॉमेडी असली तरी हसवता हसवता ती प्रेक्षकाला अंतर्मुखही करते.