मराठी मालिका विश्वात अवघ्या काही वेळातच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणाऱ्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करून गेलं. त्यातीलच एक नाव म्हणजे रसिका सुनील, अर्थात सर्वांची लाडकी शनाया. गुरुनाथच्या प्रेमात असणाशी, काहीशी बालिश वागणारी, एखाद्या लहान मुलीप्रमाणे हट्ट करणारी आणि असंख्य चुका करणारी, त्याच चुकांमुळे अडचणींमध्ये सापडणाऱ्या शनायाने उच्च शिक्षण घेण्याच्या कारणास्तव मालिका सोडली. रसिका सध्या परदेशात अभिनयात उच्च शिक्षण घेत आहे. त्याचसोबत तिने अमेरिकेत स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि याबाबतचे प्रमाणपत्रही तिला मिळाले आहे.

स्कूबा डायव्हिंग सोपे असेल असे तिला वाटले होते. पण याच्या अभ्यासक्रमासाठी चारशे पानाचे पुस्तक होते. लेखी परीक्षा झाली. खूप शास्रोक्त गोष्टीही शिकाव्या लागल्या. रसिका याबाबत तांत्रिक गोष्टीही शिकली. स्कूबा डायव्हिंग केवळ मजा नसून एक जबाबदारीचा खेळ आहे. यात जोडीदाराचीही काळजी घ्यावी लागते.

rasika sunil

‘पाण्याच्या तळाशी स्टारफिश पाहिले. वेगवेगळ्या रंगांचे सी अर्चिन्स दिसले. पॅसिफिक महासागराचे पाणी खूप थंड आहे. पाण्याखाली नऊ सेल्सियस तापमान असते. त्यानुसार खास सूट परिधान केला. स्कूबा डायव्हिंग करायचे आधीपासूनच मनात होते आणि हे शिकल्याचा फायदाही आहे,’ असेही ती म्हणते.

याआधी तिने विमान उडवायचे धडेसुद्धा गिरवले. मालिकेमुळे रसिकाची लोकप्रियता इतकी वाढली की तिच्या छोट्याछोट्या गोष्टी जाणून घेण्याचीही चाहत्यांना फार उत्सुकता असते. परदेशात असली तरीही रसिकाने चाहत्यांसोबतचं नातं कायम जोडून ठेवलं आहे. सोशल मीडियाद्वारे ती अनेकदा चाहत्यांशी संवाद साधते.