एखाद्या कलाकृतीला विरोध करणं हेही आता प्रसिद्धीच्या हत्यारांमध्ये सामील होतंय. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेला विरोध करण्यावरून सुरू असलेल्या वाद, चर्चेवर तटस्थपणे  टाकलेली एक नजर.

नवं काहीतरी समोर आलं की त्याला विरोध करायचा हे सवंग प्रसिद्धीचं नवं हत्यार. गोष्टी तपशिलात समजून घेऊन कृती करण्यापेक्षा आम्ही कसा सगळ्यात आधी निषेधाचा झेंडा दाखवला यालाच ग्लॅमर प्राप्त झालं आहे. दुसरीकडे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी नकारात्मक प्रसिद्धीचा खुबीने उपयोग करण्याचे तंत्रही विकसित झाले आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या निमित्ताने अवघ्या आठवडाभरात वादाची राळ उडाली आहे. एकुणात रात्री प्रक्षेपित होणाऱ्या या मालिकेने दिवसाकरता पुरेसे नाटय़ उभे केले आहे. मालिकेचं समर्थन करण्याचा विडा आम्ही उचललेला नाही आणि मालिकेला विरोध करणाऱ्यांची नांगी ठेचण्याची जबाबदारी आमच्यावर देण्यात आलेली नाही. तटस्थ भूमिकेतून मांडलेले मुद्दे.

– झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमुळे कोकणातील पर्यटनावर विपरीत परिणाम होत आहे असा आरोप केला जात आहे. प्रदूषणविरहित वातावरण, दळणवळणाची साधनं आणि निवास-आहाराच्या उत्तम सोयी-सुविधा यांमुळे गेल्या काही वर्षांत कोकणातले पर्यटन वाढीस लागले आहे. या बदलामुळे अनुपम सौंदर्याने नटलेली सुरेख गावं, मंदिरे, लेणी, समुद्रकिनारे, पाखाडय़ा, बागा पर्यटकांसमोर येत आहेत. कोकणच्या अर्थकारणासाठी हा बदल सकारात्मक असाच आहे. पर्यटन व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी सुरक्षितता हा कळीचा मुद्दा ठरतो. मालिकेत दाखवले जाणारे गूढ आवाज, माणसं यामुळे पर्यटकांना कोकण सुरक्षित वाटणार नाही आणि पर्यटकांचा ओघ आटेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मुद्रित माध्यमांपेक्षा दृकश्राव्य माध्यमांचा प्रेक्षकांवर अधिक परिणाम होतो हे मान्यच आहे. एखादी कलाकृती पाहून पर्यटनाला तिथे जायचं की नाही हे ठरवण्यासाठी ते ठिकाण कोणते हे माहिती असणे आवश्यक आहे. मालिकेतले गाव कोणते याची किती प्रेक्षकांना कल्पना आहे? मालिकेच्या सुरुवातीलाच कथानक, पात्रे काल्पनिक असल्याची पाटी येते. त्यामुळे मालिका पाहणाऱ्यांना गाव कोणते हे लक्षात आले तरी कलाकृतीसाठी निर्मिलेल्या गूढ आभासी गावाला घाबरावे का? असाही प्रश्न उरतो.

– आपल्या राज्याला विविधांगी संस्कृती लाभली आहे. विविध जातीधर्माचे, पंथाचे नागरिक आपापल्या प्रथा, परंपरा आजच्या टेक्नोसॅव्ही जगातही रीतसर पाळतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या साक्षेप संकल्पना आहे. एमबीबीएसची कठीण डिग्री मिळवलेले डॉक्टरही आपल्या क्लिनिकला लिंबूमिरची लावतात.  असंख्य घरांमध्ये मुलामुलींची दृष्ट काढली जाते. कोणाला हे सगळं चुकीचं, अशास्त्रीय आणि परंपरावादी-कर्मठ वाटेल तर कोणासाठी ही श्रद्धेची गोष्ट असेल. आपल्या प्रगतीला कुणाची नजर लागू नये म्हणून करतो असा युक्तिवादही केला जातो. अशा चालीरीती महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात असतात. भौगोलिक वातावरणानुसार त्याचे स्वरूप बदलते. रात्री फिरताना येणाऱ्या अनुभवांच्या दंतकथा पिढय़ान्पिढय़ा ऐकवल्या जातात. मानवी शक्तीच्या पलीकडेही हे विश्व चालवणारी शक्ती आहे हे आपल्या सगळ्यांनाच मान्य व्हावे. मात्र अनेकदा या अज्ञात शक्तींचे भय दाखवून अघोरी, अमानुष प्रकार होत असतात. या चालीरीती चूक का बरोबर हे सापेक्ष आहे. त्या पाळाव्या की नाही हेही सापेक्ष. ब्ल्यूटूथ, जीपीआरएस, सॅटेलाइटरूपी जगातही मलेशियाचे दीडशेहून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कुठे गायब झाले याचे उत्तर अद्यापही सापडलेले नाही. मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या असतील तर मग गॅझेट्स आणि गिझ्मो जगातही बम्र्युडा ट्रँगलचं कोडं आपण सोडवू शकलेलो नाही. त्यामुळे कोकण असो, विदर्भ असो, का मराठवाडा किंवा आणखी काही- प्रत्येक माणसाचा अनुभव प्रमाण.

–  या मालिकेवर, त्यात दाखवल्या जाणाऱ्या रूढींमुळे परिणाम होतो असा आरोप राजकीय नेते आणि पक्षांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीने महिला पोलिसाला मारहाण केली. रस्त्यात गाडी थांबवून मोबाइलवर बोलत असल्यामुळे महिला पोलिसांनी गाडी थांबवल्यामुळे चिडलेल्या या महाशयांनी वर्दीतील पोलिसांना अर्वाच्य भाषेसह मारहाणही केली. याआधीही त्यांच्या नावावर हिंसक स्वरूपाचे गुन्हे आहेत. काही आठवडय़ांपूर्वीच हिंगोलीमध्ये सदस्यांनी पोलिसांना मारहाण केली होती. फुकट वडापाव मिळाला नाही म्हणून दुकानदाराला फटकवणारे आपण पाहत असतो. राजकीय पाश्र्वभूमी असलेल्या टगेखोरांचे उद्योग सर्वश्रुत आहेत. या प्रसंगांनी पक्ष म्हणून, माणुसकी म्हणून आणि एकूणच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे काय धिंडवडे निघू शकतात याचे दर्शन घडले. मालिकेतल्या काल्पनिक जगतापेक्षा हे अधिक गंभीर आणि विघातक आहे.

–  भूतखेतं, गूढ आवाज, अंधार या आणि तत्सम गोष्टी दाखवणारी ही पहिली मालिका नाही. ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी लिखित ‘गहिरे पाणी’ने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. २००९ मध्ये ईटीव्हीवर अनामिका नावाची मालिका सुरू झाली होती. खासगी वाहिन्यांचा सुळसुळाट होण्यापूर्वी सरकारी वाहिनीवर ‘श्वेतांबरा’ नावाची मालिका प्रचंड गाजली होती. त्या मालिकेला विरोध झाल्याचे ऐकिवात नाही. जागतिकीकरणाच्या रेटय़ानंतर खासगी वाहिन्यांचे पेवच फुटले. नव्वदीच्या दशकात ‘झी हॉरर शो’ नावाची मालिका लोकप्रिय झाली होती. अंतरंगी, अतार्किक आणि गूढरम्य गोष्टी दाखवणारी सोनी वाहिनीवरील ‘आहट’ मालिकेला असंख्य प्रेक्षकांनी विरोध केला होता. विरोध होऊनही १९९५ ते २०१५ या कालावधीत मालिकेचे विविध हंगाम येतच गेले आणि त्याला प्रेक्षाधारही मिळाला. वो (सरकारी वाहिनी), फिअर फाइल्स (झी टीव्ही), शू.. कोई है.. (स्टार प्लस), मानो ना या मानो (झी टीव्ही), रात होने को है (सहारा वन), भूत आया (सोनी) अशा असंख्य मालिका येत राहिल्या. ज्या अर्थी या संकल्पनाधारित मालिका सातत्याने प्रक्षेपित होत आहेत, याचाच अर्थ प्रेक्षकवर्ग आहे म्हणूनच अशा मालिकांची निर्मित्ती होत आहे.

–  कोंबडी आधी की अंडं हा यक्ष प्रश्न आहे. गूम्ढ, भूताखेतांप्रमाणे गुन्हेविषयक मालिकांनी दमदार टीआरपी मिळतो. या मालिकांमुळे मुलं बिघडतात, त्यांना वाईट सवयी लागतात, हिंसक भावना वाढीस लागते असा नेमाने आरोप होतो. दुसरीकडे समाजात जे घडतं ते आम्ही दाखवतो, कपोलकल्पित काहीही नाही असा मालिका निर्मात्यांचा दावा असतो. यामध्ये कोण्या एकाची बाजू घेता येणार नाही. मालिका न बघताही हिंसक गोष्टींचे प्रमाण वाढतेच आहे. एका तरुण मुलाने घरातल्या १४ जणांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. ट्रेनमधून जाताना दुसऱ्याला टपली मारताना स्वत:चा जीव गमावणारा तरुण, किरकोळ रकमेसाठी जीव घेणारी माणसं, मुलीवर अत्याचार करणारा पिता अशी असंख्य नकारात्मक उदाहरणं आजूबाजूला घडत आहेत. पडद्यावर दिसणाऱ्या मालिकेपेक्षा रोज सभोवताली घडणाऱ्या नकारात्मक गोष्टींचं काय? आपण कशाने प्रेरित व्हायचं, काय पाहून आपल्याला त्रास होतो, कशानं बरं वाटतं याचा सुज्ञपणे विचार करायला हवा. आजूबाजूला अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही ध्येय उराशी बाळगून कारकीर्द घडवणारी माणसं आपल्या समाजात आहेत. दुसरीकडे पैसाआडका, घरदार, नातेवाईक असं सगळं असतानाही धुळधाण उडणारी आयुष्यं समोर आहेत. आपण कुठचा मार्ग स्वीकारायचा हे आपल्याच हाती.

–  कोकणातली भुतं लई वाईट अशी एक कॅचलाइन मालिकेच्या निमित्ताने वारंवार ऐकायला येतं. ती ऐकून घाबरायला होत असेल तर गंमतच वाटायला हवी. कारण आतापर्यंत असंख्य कथाकादंबऱ्या, कवितांमधून, सांगोवांगीच्या गोष्टींमधून कोकणच्या भुतांचं वर्णन झालं आहे. कोकणच्या भुतांचा उल्लेख करणारी ही पहिलीच कलाकृती नाही. मालिकेचा प्रोमो पाहून घाबरायला होत असेल तर आपली साहित्यिक समज तपासून घ्यायला हवी. लहान मुलांसाठीच्या व्हीडिओ गेम्समध्ये, टॅबवरच्या आणि स्मार्ट फोन्समध्ये राक्षसी स्वरूपाची विकृत पात्रं असतात. ती क्रिएटीव्ह मानली जाते.

–  कलाकृती लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रमोशन हे मुख्य अस्त्र आहे. नकारात्मक प्रसिद्धीचा खास आमिर खान मंत्र सध्या अनेकजण जपतात. चित्रपट असो, मालिका किंवा कुठलीही कलाकृती- प्रदर्शित होण्याच्या महिनाभर आधी वादाची राळ उडवून द्यायची. पब्लिसिटी होते, निगेटिव्ह पब्लिसिटी वर्क्‍स असं थेट जनसंपर्क अर्थात पब्लिक रिलेशन्स विषयाचा सिद्धांत सांगतो. कथित वाद उडवून दिलेला असतो त्यात फारसं तथ्य नसल्याचं चित्रपटाने शंभर कोटींचा गल्ला केल्यावर लक्षात येतं. उत्पादन खपवण्यासाठी एकेक नवीन क्लृप्त्या शोधून काढल्या जातात. सुदैवाने या मालिकेने तसेच वाहिनीने स्वत:हून असा काही कथित वाद निर्माण केलेला नाही.

–  मालिका सुरू होऊन जेमतेम दोन आठवडे झाले आहेत. आतापर्यंत हळूहळू पात्रांची ओळख होते आहे. कथानक मनात रुजते आहे. गूढ आहे काहीतरी अशी जाणीव झाली आहे, पण नंतर चित्र पालटू शकते. या गूढ गोष्टींना पुरून उरणारा एखादा सुधारक अवतरू शकतो. किंवा घरातलेच या समज गैरसमजांपासून लांब जाऊ शकतात. घरात डिझायनर साडय़ा, किमती आभूषणं घालून वावरणाऱ्या आणि सतत कटकारस्थानं रचणाऱ्या वास्तव जगतापासूनच्या फार दूरच्या जगातली कथानकं आपण आपलीशी करतो. अनोळखी स्त्री आणि पुरुष एकमेकांशी बोलले म्हणजे त्यांचं थेट लग्नच लावायला हवं अशा समजातून निर्माण होणाऱ्या लग्नफॅक्टरी मालिकांच्या चळती मांडल्या जात असताना आपण त्याचा भाग होतो. मग या मालिकेतलं घर, त्यांच्या सवयी, वातावरण समजून घ्यायलाच हवं. तरच आपण खरे सहिष्णू म्हणू शकू.

– मालिकेतल्या मालवणी भाषेवर खूपजणांनी आक्षेप घेतला आहे. मुळातच आता आपण शंभर टक्के एका भाषेत लिहीत अथवा बोलत नाही. इंग्रजीमिश्रित मराठी रूढ झालं आहे. पुलंच्या गटणेसदृश शुद्ध तुपातलं मराठी आपण कोणीच बोलत नाही. मग आपण चुकीचे का? सावरकरांच्या मराठीसारखं आपण लिहीत नाही. मग आपण दोषी का? टीव्ही आणि इंटरनेटच्या प्रभावामुळे भाषेची अवस्था एक ना धड भारभर चिंध्या झाली आहे. हे भूषणावह नक्कीच नाही; पण ते स्वीकारायला हवं. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या वर्तमानपत्रांनीही मिंग्लिश भाषेला आपलंसं केले आहे. भाषेचा लहेजा, उच्चार या खास घोटीव गोष्टी आहेत. मालिकेत त्यासंदर्भात चुका असतील तर आक्षेप योग्यच. पण मराठी अथवा हिंदी-इंग्रजी प्रेरित मालवणी असेल तर त्यात दोष काहीच नाही.

– पूनम पांडे, राधेमाँ, यो यो हनी सिंग, खली तसंच झटपट डोक्यावर केशसंभार आणण्याचा दावा करणारे शो, हसं करून घेणारे डब कार्यक्रम, संस्कृती सोडाच एकूण आकलनाची लक्तरं वेशीवर मांडणारे रोडीज आणि स्पिट्सव्हिला, बिग बॉस अशा टाकाऊ, टपराट, भरताड, सवंग पुष्कळ कार्यक्रमांची जंत्री आपण अनुभवतो. तद्दन बोगस कार्यक्रमांबद्दल आपण चक्कार शब्दही काढत नाही. मग या मालिकेला वेगळा न्याय का? आताच्या काळाला न साजेसं तसंच चुकीचा संदेश देणारं मालिकेत काही असेल तर विरोध, टीका जरूर व्हावी. पण ती सर्वसमावेशक असावी आणि युक्तिवाद, तर्कसुसंगत असायला हवी.

– सौंदर्य आणि बीभत्स यामध्ये धुसर रेषा असते. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधला फरकही पुसट असतो. मास मीडिया अर्थात हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहचणाऱ्या कलाकृतीवर एक जबाबदारी असते. अनेकदा नाटक, पुस्तक, चित्र, यांनी क्रांतीचे रणशिंग चेतवले आहे. आणि त्याच वेळी काही कलाकृतींमुळे समाजातली तेढ वाढली आहे. ध्रुवीकरणाचं एक टोक सकारात्मक बिंदू दर्शवतं आहे तर दुसरं विघातक. एका देशाचे स्वातंत्र्यसैनिक दुसऱ्या देशासाठी मात्र दहशतवादी ठरतात. त्यामुळे विचारप्रवाह समजून घेणं ही प्रेक्षकांवरची वाढलेली जबाबदारी आहे. मूल्यव्यवस्थेला धक्का लागेल अशा कलाकृतीला विरोध होऊ शकतो; परंतु त्यासाठी त्या कलाकृतीने किमान टप्पा पूर्ण करायला हवा. तरच गोष्टी तपशिलात उलगडू शकतात.
पराग फाटक – response.lokprabha@expressindia.com   aru001