24 February 2019

News Flash

नकटीसाठी स्थळ शोधता शोधता माझंच लग्न जमलं….

सर्वांचा लाडका पांडू लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

मे महिन्याच्या शेवटी प्रल्हाद आणि अंजली विवाहबद्ध होणार

‘पाचोळा सैरावैरा…’ या शीर्षक गीताची सुरुवात झाली की सर्वांच्याच नजरा एकाच ठिकाणी खळवून ठेवणारी मालिका म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर चांगचीच छाप पाडली होती. या मालिकेतील प्रत्येक पात्रं जणू काही प्रेक्षकांच्या कुटुंबातीलच एक भाग बनून गेले. अण्णा, माई, निलिमा, सरिता, दत्ता, माधव, सुषमा या सर्वच पात्रांच्या गर्दीत एक चेहरा प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेला. तो चेहरा म्हणजे पांडू अर्थात प्रल्हाद कुडतरकरचा.

‘माईनु…… अण्णा इलंय’ असं म्हणण्याचा त्याचा अंदाज असो किंवा मग ‘कायता…. इसरलंय’ असं म्हणत त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे विचित्र भाव असोत पांडूने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांवर चांगलीच पकड बनवली.  एका मालिकेच्या निमित्ताने पांडू म्हणजेच प्रल्हादचा चेहरा पहिल्यांदाच सर्वांसमोर आला आणि आपलासा झाला. अशा सर्वांच्या लाडक्या पांडूचा म्हणजे लेखक-अभिनेता प्रल्हाद कुडतरकरचा साखरपुडा नुकताच पार पडला. आयुष्यातील या नव्या वळणाविषयी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना प्रल्हाद म्हणाला, ‘एकीकडे मी नकटीसाठी स्थळ शोधतोय, मालिकेचं लिखाण करतोय तर दुसरीकडे नकटूसाठी स्थळ शोधता शोधता फायनली माझंच लग्न होत आहे. गेल्या बऱ्याच काळापासून मी विविध कामांमध्ये बराच व्यग्र असल्यामुळे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीतच आमचा साखरपुडा पार पडला. पण, लग्नाला मात्र मी सर्वांनाच बोलवणार आहे.’

pandu-engagement1

पांडूच्या व्यक्तिरेखेमुळे चर्चेत आलेल्या प्रल्हादला जेव्हा त्याच्या होणाऱ्या पत्नीने पाहिलं तेव्हा तिची काय प्रतिक्रिया होती असे विचारले असता ‘ती पांडूला बघायला आली नव्हती’, असे म्हणत त्याने होणा-या पत्नीविषयीही दिलखुलास बोलणे पसंत केले. प्रल्हादची होणारी पत्नी मूळची मुंबईचीच असून ती एक योगा प्रशिक्षक आहे. त्यासोबतच तिने ‘रेकी’ या प्रकाराचे पदव्युत्तर शिक्षणही घेतले आहे. अंजली कानडे असं प्रल्हादच्या होणाऱ्या पत्नीचं नाव असून सध्या प्रल्हाद कामामध्ये व्यग्र असल्यामुळे तिच्यासोबत जास्त वेळ व्यतीत करु शकत नसला तरीही तो तिच्यासोबत काही सुरेख क्षण एकत्र घालवण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे. काही दिवसांतच म्हणजेच मे महिन्याच्या शेवटी प्रल्हाद आणि अंजली विवाहबद्ध होणार आहेत. त्यामुळे आता प्रल्हादच्या लग्नाचे सनई-चौघडे आधी ऐकायला मिळणार, की नकटूला तिचा जोडीदार शोधून दिल्यानंतरच प्रल्हादचं लग्न होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First Published on March 11, 2017 8:54 am

Web Title: ratris khel chale fame pralhad kudtarkar aka pandu got engaged with anjali kanade