गूढ आणि अतक्र्य गोष्टींचे मानवी मनाला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे आणि यापुढेही ते वाटत राहील. बुद्धी आणि विज्ञानाच्या जे पलीकडे आहे, ज्याची आपल्याला उत्तरे मिळत नाहीत त्याची उत्तरे मिळविण्याचा आपण सतत प्रयत्न करत असतो. मराठी ललित साहित्यातून आजवर अशा गूढ-अतक्र्य गोष्टींचे दर्शन वाचकांना घडले आहेच. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधूनही यापूर्वी अशा गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. हिंदीत तर अशा अनेक मालिका सादर झाल्या आहेत. ‘झी मराठी’वरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून तोच खेळ पुन्हा एकदा वेगळ्या रूपात सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र या मालिकेला मिळालेली लोकप्रियता आणि पुन्हा एकदा त्या जागी येणारी रहस्यमय मालिका पाहता अशा विषयांचा प्रेक्षकवर्ग मराठीतही तयार होतो आहे. त्यानिमित्ताने आत्तापर्यंत लोकप्रिय ठरलेल्या दूरदर्शनवरील गूढ मराठी मालिकांचा हा ऊहापोह..

आत्मा, भूत-प्रेत, पिशाच्च, मरणानंतरचे जीवन, जादूटोणा, मंत्र-तंत्र, काळी विद्या, भानामती, करणी असे शब्द खरे तर सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडले. काही अपवाद सोडले तर बाकीच्यांना हा विषय माहिती असण्याची शक्यता नाही. अशा गोष्टी आपल्याकडे यापूर्वी मराठी  साहित्यातून येऊन  गेल्या आहेत. विशेषत: कोकणच्या पाश्र्वभूमीवरील कथा, कादंबरी, नाटक आदी साहित्य प्रकारातून याला आपण सामोरे गेले आहोत.  जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, श्री. ना. पेंडसे आदी लेखकांच्या साहित्यातून याचे प्रतिबिंब उमटले आहे. रत्नाकर मतकरी यांच्या गूढकथांची मोहिनी आजही आत्ताच्या तरुण पिढीवर तसेच विद्यार्थ्यांवर असल्याचे दिसून येते.

पुस्तकातून आपण जेव्हा या कथा वाचतो तेव्हाही आपल्या अंगावर कधीतरी सर्रकन काटा उभा राहतो. मनाच्या  एका कोपऱ्यात ‘ते’ खरे असेल का, असाही प्रश्न उभा राहतो. पण हेच जेव्हा दृकश्राव्य माध्यमातून छोटय़ा पडद्यावर येते तेव्हा ते अधिक प्रभावी ठरते. या मालिकांमधून अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही, ‘अशा’ गोष्टींवर कोणीही विश्वास ठेवू नये, मालिका पाहून कोणाही बुवा-बाबाच्या नादी लागू नये, मालिकेत जे दाखविण्यात येते ते सर्व काल्पनिक आहे, असे जरी सांगितले जात असले तरीही सर्वसामान्य प्रेक्षक  त्यात दाखविल्या  जाणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. याचे कारण म्हणजे गूढ आणि अतक्र्य गोष्टींचे मानवी मनाला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. त्याचे चित्रण प्रेक्षक पडद्यावर पाहातात तेव्हा ते त्याच्याशी समरस होतात. आपल्या जीवनात घडलेले प्रसंग किंवा आलेल्या एखाद्या अनुभवाशी त्याची तुलना केली जाते. आणि मग दूरचित्रवाहिनीवर सुरू असलेली मालिका, त्यातील पात्रे प्रेक्षकांना आपलीशी वाटायला लागतात. मुळात अशा विषयांची आवड किंवा कुतूहल असल्याने प्रेक्षकवर्ग आपोआपच या मालिकांकडे खेचला जातो. अर्थात  केवळ विषय गूढ आणि भुता-खेतांचा आहे म्हणून ती मालिका लोकप्रिय होते असे नाही. तर मालिकेची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि अभिनय हेही तितकेच कसदार असावे लागते. हे सगळे जुळून आले की ती मालिका प्रेक्षकांना आपलीशी वाटतेच वाटते. मग मालिकेत लोकप्रिय कलाकार नसले तरीही प्रेक्षकांना काहीही फरक पडत नाही. ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका त्याचेच उदाहरण आहे. मालिकेतील एकही कलाकार माहितीचा किंवा ओळखीचा नव्हता, तरीही ही मालिका व त्यातील सर्व पात्रे लोकप्रिय झाली हे त्या मालिकेच्या सर्व संबंधित विभागांचे व चमूचे सांघिक यश आहे, असेच म्हणावे लागेल.

दूरचित्रवाहिन्यांवरून सादर होणाऱ्या मालिकांचाही उद्देश समाजात अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा ‘अशा’ गोष्टी खऱ्याच आहेत, असे सांगणारा नसतो. तशा आशयाची पाटीही मालिकेच्या सुरुवातीला दाखविली जाते. पण असे असले तरी मानवी मनाला ‘अशा’ गोष्टींचे आणि विषयाचे कुतूहल आहे, तोपर्यंत ‘अशा’ मालिका सुरू राहणार, त्या लोकप्रिय होणार आणि ‘अशा’गोष्टी खऱ्या की खोटय़ा त्यावर चर्चा व वादही होतच राहणार. हिंदीत सध्या गूढकथांचा नव्हे तर काळीजादू आणि तत्सम विषयांवरच्या मालिकांचा प्रभाव वाढतो आहे. त्यामुळेच ‘नागिन’सारख्या मालिका दुसरे पर्व घेऊन येत आहेत. मराठीत अजूनतरी गूढ किंवा रहस्यमय विषयांचीच मांडणी झाली आहे, पण या विषयांवरच्या मालिकांचे प्रमाण मराठीत अजूनही नगण्यच आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे झी मराठीने रात्रीची साडेदहाची वेळ खास ‘अशा’ विषयांवरील मालिकांसाठीच राखून ठेवण्याचे ठरविले आहे. त्याजागी आता ‘हंड्रेड डेज’ ही नविन रहस्यमय मालिका दाखल होते आहे. कदाचित या मालिकांना यश मिळते आहे हे लक्षात आले तर अन्य मराठी वाहिन्यांवरही गूढकथा मालिकांचा जॉनर स्थिर होईल.

मराठीत सादर झालेल्या गूढ मालिकांचा धावता आढावा

*  श्वेतांबरा

मुंबई दूरदर्शन केंद्रावरून सादर झालेली ‘श्वेतांबरा’ ही या विषयावरील पहिली मराठी मालिका म्हणता येईल. गूढ, रहस्यमय असलेल्या या मालिकेने त्या काळात प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.

* गहिरे पाणी

रत्नाकर मतकरी यांच्या गूढ कथा नेहमीच वाचकांना आकर्षित करणाऱ्या ठरल्या आहेत. मतकरी यांच्या कथेचा शेवट नेहमीच धक्कादायक असतो. मतकरी यांच्याच गूढ कथांवरील ‘गहिरे पाणी’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आजवर जे वाचले ते प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळाले होते.

* अनोळखी दिशा

नारायण धारप हे नाव गूढ, रहस्यमय कथाविषयांशी जोडले गेले आहे. धारप यांच्या कथा-कादंबऱ्यांना आजही ग्रंथालयातून वाचक पसंती आहे. धारप यांच्या कथांवर आधारित ‘अनोळखी दिशा’ या मालिकेची निर्मिती अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केली होती. या मालिकेनेही आपला स्वतंत्र प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता.

* असंभव

मराठीतील दिग्गज कलाकार असलेली ‘असंभव’ ही मालिकाही अशीच गूढ व रहस्यमय होती. या मालिकेत पुनर्जन्माचा विषय हाताळण्यात आला होता. मालिकेतील ‘सोपान आजोबा’, ‘सुलेखा’, ‘तनिष्का’ आदी पात्रे लोकप्रिय झाली होती. एवढेच नाहीतर गूढ विषय असूनही दीर्घकाळ चाललेली अशी ही मालिका म्हणता येईल.

* एक तास भुताचा

‘मी मराठी’ वाहिनीवरून ‘एक तास भुताचा’ ही मालिका काही वर्षांपूर्वी प्रसारित झाली होती. मालिकेत भूत, प्रेत, आत्मा, जादूटोणा, काळी विद्या असे विषय होते.

 

गूढमालिकांचा शेवट आधीच कळू नये म्हणून निर्मात्यांची अनोखी क्लृप्ती

गूढकथेवरील मालिकांचा शेवट आधीच जाहीर झाला तर त्यात प्रेक्षकांना रस उरत नाही. सध्या थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच घरात आपल्या मोबाइलवर अवतरतात तिथे मालिका अशा प्रकारच्या ‘गळती’ला अपवाद कशा राहतील. त्यामुळेच ‘रात्रीस खेळ चाले’चा शेवट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू नये यासाठी मालिकेचे निर्माते आणि वाहिनीने अनोखी शक्कल लढवली आहे.

सध्या व्हॉट्स अ‍ॅपवर नीलिमाला आणि सुशल्याला पोलीस पकडून नेत असल्याची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. त्यामुळे नीलिमा आणि सुषमा यांनी नाईकवाडय़ातील कारवाया कशा केल्या असतील याबद्दल कट्टय़ाकट्टय़ावर आणि घराघरांत चर्चा रंगल्या आहेत. ज्या प्रेक्षकांना हा प्रसिद्धीचा फंडा वाटतो आहे ते अजूनही खरा खुनी कोण हे शोधण्यात दंग आहेत. मालिकेतील खरा गुन्हेगार कोण? यावर राज्यात ठीकठिकाणी पैजा लागल्या असल्याच्या गोष्टी आमच्या कानावर आल्या आहेत, अशी माहिती मालिकेचे सहनिर्माते संतोष अयाचित यांनी दिली. त्यामुळेच की काय पण मालिकेचे चित्रीकरण संपले असले तरी अजून त्यातील कलाकारांनाही खरा गुन्हेगार कोण हे माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.

मालिकेचा शेवट बाहेर पडू नये यासाठी त्यातील प्रत्येक कलाकाराबरोबर तो गुन्हेगार आहे असे समजून स्वतंत्र चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने नीलिमा आणि सुषमाची छायाचित्रे सगळीकडे पसरली आहेत तशी ती माधव, अभिराम, दत्ता यांच्यापैकी कोणाचीही असू शकतात. यांच्यापैकी जो खरा गुन्हेगार आहे त्याची दृश्ये संकलित करून मग हे रहस्य पडद्यावर लोकांसमोर आणण्यात येणार आहे. त्यामुळे बाहुबलीने कटप्पाला का मारले? हा प्रश्न जसा लोकांच्या मनात अनुत्तरित आहे तसाच नाईकांमधला खरा गुन्हेगार कोण? हेही अजून गुलदस्त्यातच आहे.