बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन लवकरच आजी होणार आहे. तुम्हाला वाचून नक्कीच धक्का बसला असेल, पण होय हे खरं आहे. रविना वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षीच आपल्या खऱ्या खुऱ्या आयुष्यात आजी होणार आहे. तिने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम पेजवरुन आजी होणार असल्याचे जगजाहीर केले.

रविनाने २००४ साली म्हणजेच १५ वर्षांपूर्वी लग्न केले. या पार्श्वभूमिवर विचार करता तिच्या मुलांचे वय १४ वर्षांपेक्षा अधिक असणे शक्यच नाही. मग ती आजी कशी काय होऊ शकते? हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल परंतु तरीही ती आजी होणार, हे मात्र सोळा आणे खरे आहे. खरं तर रविनाने लग्नापुर्वीच दोन मुलींना दत्तक घेतले होते. १९९५ साली दत्तक घेतलेल्या या मुलींची नावे छाया आणि पूजा अशी आहेत. त्यावेळी पूजाचे वय ११ वर्ष होते तर छाया आठ वर्षांची होती. यातील छाया आता लवकरच आई होणार आहे. त्यामुळे छायाची आई रविना आपल्या मुलीच्या बाळाची आजी होणार आहे.

 

रविनाने नुकताच आपल्या मुलीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमात रविनाने नानी असे लिहलेले कपडे घातले होते. या कार्यक्रमाचे फोटो तिने सोशल मिडीयावर अपलोड केले आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते खुश झाले आहेत. व त्यांनी रविनावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.