बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी रविनाने एक आवाक् करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. पोलिसांनी एका आजोबांचा चक्क वाढदिवस साजरा केला आहे.

या व्हिडीओमध्ये दिसणारे आजोबा ७१ वर्षांचे आहेत. त्यांची मुलं परदेशात राहतात. लॉकडाउनमुळे ते तिथेच अडकले आहेत. सध्या हे आजोबा आपल्या घरात एकटेच राहतात. आपल्या वाढदिवशी त्यांना कुटुंबियांची खूप आठवण येत होती. परंतु या नाराज आजोबांचा वाढदिवस साजरा करुन पोलिसांनी त्यांना खुश केलं.

सर्वप्रथम पोलिसांनी काही तरी विचारण्याच्या बहाण्याने त्यांना गेटजवळ बोलावलं. त्यांना विविध प्रश्न विचारले. त्यानंतर अचानक त्यांच्यासमोर केक सादर करुन त्यांना आश्चर्यचकित केलं. लॉकडाउनच्या काळात दिवसरात्र एक करुन जागता पाहारा देणाऱ्या पोलिसांनी त्यांच्याबाबत व्यक्त केलेले प्रेम पाहून आजोबा भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहात होते. रविनाने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा व्हिडीओ अभिनेत्री तापसी पन्नू हिने देखील काही तासांपूर्वी शेअर केला होता.