‘दंगल’ या हिट चित्रपटातून अगदी कमी वयामध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. माझे करिअर धर्माच्या आड येत असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले आहे. झायरा वसीमच्या निर्णयावर बॉलिवूडसह सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत असून अभिनेत्री रवीना तंडनने तीव्र शब्दामध्ये संताप व्यक्त केला होता. पण हे सर्व करण्यास झायरावर दबाव टाकण्यात आला असावा असे म्हटले जात आहे. आता रवीनाने केलेल्या ट्विटचा तिला पश्चाताप होत असल्याचे रवीनाने सांगितले आहे.

रवीनाने तिच्या ट्विटर अकाऊंवरुन ट्विट करत पश्चाताप होत असल्याचे म्हटले आहे. या ट्विटमध्ये तिने ताबडतोब केलेल्या ट्विटबद्दल खेद व्यक्त केला आहे. कदाचित हे सर्व लिहिण्यासाठी तिला भाग पाडण्यात आले असावे असे रवीनाने ट्विटमध्ये लिहिले आहे.

यापूर्वी रवीनाने झायराच्या पोस्टला उत्तर देत राग व्यक्त केला होता. ज्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये एक-दोन चित्रपटच केले आहेत, जे कलाविश्वाबद्दल दोन चांगले शब्द बोलू शकत नसतील तर अशांनी या कलाविश्वातून बाहेर पडले तरी काही फरक पडत नाही असे रवीना म्हणाली होती. अशा व्यक्तींनी या कलाविश्वातून अभिमानाने बाहेर पडावे आणि त्यांनी त्यांचे विचार त्यांच्यापूरतेच मर्यादित ठेवावेत अशा प्रकारे रवीनाने तिचा संताप व्यक्त केला होता.

‘दंगल’ या चित्रपटातून अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने कुस्तीपटू गीता फोगाटच्या लहानपणाची भूमिका साकारली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयावर प्रेक्षक भाळले होते. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. उत्कृष्ट अभिनय कौशल्य असलेल्या झायराने अचानक बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतल्यावर अनेकांना धक्का बसला आहे.

अभिनयाचे क्षेत्र मला माझ्या इमानपासून दूर खेचत आहे. मी अल्लाहच्या रस्त्यापासून भरकटले होते, असे म्हणत झायराने बॉलिवूडला रामराम केला. तिने नुकतंच ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. तिने घेतलेल्या निर्णयामुळे हा चित्रपट तिचा बॉलिवूडमधला अखेरचा ठरेल.