पांढरकवड्यातील वाघिणीच्या हत्येचा वाद कायम असताना गुरुवारी चांदाफोर्ट- गोंदिया पॅसेंजरच्या धडकेत वाघाच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला. दोन बछडे रुळावर तर तिसरा बछडा रुळापासून ५०० मीटरवर मृतावस्थेत आढळला. या घटनेनंतर अभिनेत्री रविना टंडनने ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. चंद्रपुरात बछड्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर रविना चांगलीच चिडली आणि ट्विट करत तिने आपला राग व्यक्त केला.

‘देशातील जंगलं नष्ट करून यांना महामार्ग आणि मेट्रो कारशेड बांधायचे आहेत. ही तर हत्याच आहे,’ असं तिने ट्विट केलं. रविना मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडमुळे यांसारख्या आणखी अपघातांना आपण निमंत्रण देत असल्याचंही तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये तिने लिहिलं, ‘प्राण्यांना एका जंगलातून दुसरीकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग बांधले असते किंवा जंगलाला कुंपण घातलं असतं तर असे अपघात टाळता आले असते आणि वाघांचे बछडे आज जिवंत असते.’ हे ट्विट करताना रविनाने सिंगापूरमधल्या एका भुयारी मार्गाचा फोटोसुद्धा शेअर केला आहे.

सहा ते आठ महिन्यांचे तीन बछडे वाघिणीसह रेल्वेमार्ग पार करताना जुनोना- मामला मार्गावर सकाळी अपघाताची घटना घडली. तर दुसरीकडे रेल्वेने मात्र बछड्यांचा मृत्यू धडकेने झाला नसून कुणीतरी मारून त्यांना येथे आणून टाकल्याचा दावा केला आहे.