जागतिक महिला दिनी सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्स महाविद्यालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका चित्रपटाची पत्रकार परिषद पार पडली. गेल्या काही महिन्यांपासून ‘न्यूड’ या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. चित्रपटाच्या नावावरूनही अनेकांच्या मनात कुतूहलाची भावना जागी झाली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. झी स्टुडिओज येत्या २७ एप्रिलला तो महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांतील प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. पत्रकार परिषदेला दिग्दर्शक रवी जाधव, झी स्टुडिओजचे निर्माते मंगेश कुलकर्णी आणि अथांश कम्युनिकेशनच्या मेघना जाधव, लेखक सचिन कुंडलकर, चित्रपटातील कलाकार कल्याणी मुळे, छाया कदम, ओम भुतकर आणि मदन देवधर तसेच तंत्रज्ञ यांची उपस्थिती होती.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, चित्रपटात मुलाच्या शिक्षणासाठी धडपड करताना एका कला महाविद्यालयात ‘न्यूड मॉडेल’ म्हणून काम करणाऱ्या यमुनेनी (कल्याणी मूळे), खऱ्या आयुष्यात सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् महाविद्यालयात गेली ३० वर्ष ज्ञानदानाचे हेच काम लक्ष्मी यांना बोलते केले. लक्ष्मी यांनी त्यांना या प्रवासात आलेले अनुभव कथन केले. लक्ष्मी म्हणाल्या की, ‘मला माझ्या कामाचा सार्थ अभिमान आहे. मला विद्यार्थ्यांनी इथे देवाचा दर्जा दिला आणि आता या विषयावर सिनेमा येऊ घातलाय. प्रेक्षकांसमोर आमची कथा मांडली जाणार आहे यासारखा दुसरा आनंद नाही.’

न्यूड मॉडेल हे कला क्षेत्रातील वास्तव असल्यामुळे या संज्ञेकडे साशंकतेने पाहणे हे त्या कलाकृतीवर अन्याय करणारे आहे. घराप्रमाणेच चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या मनातही एक उंबरठा असतो. त्यामुळे ‘न्यूड’ चित्रपटाविषयीचे धुके लवकरच निवळेल, असा विश्वास दिग्दर्शक रवी जाधवने पत्रकार परिषदेत व्यक्त केला. ‘मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मी निर्माण करीत असलेल्या कलाकृतींमध्ये अश्लीलता नाही, तर कलात्मकताच असेल, याची खात्री बाळगावी,’ असे तो म्हणाला.

अथांश कम्युनिकेशन्स आणि झी स्टुडिओज यांनी ‘न्यूड’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा रवी जाधवची असून, पटकथा आणि संवाद सचिन कुंडलकरने लिहिले आहेत. या सिनेमाचे अमलेंदू चौधरीने छायाचित्रण केले आहे तर संकलन अभिजीत देशपांडेचे आहे. कथेला अनुसरुन कला दिग्दर्शन करण्याची जबाबदारी संतोष फुटाणे आणि महेश साळगावकर यांनी पेलली. वेशभूषा साकारली आहे मेघना जाधव यांनी. सौरभ भालेराव यांचं पार्श्वसंगीत चित्रपटात असून सायली खरे आणि विद्या राव यांनी वैयक्तिकरित्या या चित्रपटात दोन गाणी लिहिली आहेत आणि स्वरबद्धही केलेली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ‘न्यूड’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आणखी एक चौकटीबाहेरील कथानक मोठ्या पडद्यावर पाहता येणार हे नक्की.