ravindra-lakhe‘सावित्री’ ही पु. शि. रेगे यांची पत्रात्मक कादंबरी एखाद्या तरल कवितेसारखीच. तिचा एकपात्री नाटय़ाविष्कार करण्याचं आव्हान दिग्दर्शक रवींद्र लाखे आणि अभिनेत्री प्रिया जामकर यांनी लीलया पेललं आहे.

सावित्री ही पु. शि. रेगे यांची कादंबरी. १९६२ मध्ये लिहिलेली. म्हणजे तिला आता ५५ वष्रे झाली. पण अजूनही तिचं गारुड जाणकार मराठी वाचकांच्या मनावरून उतरलेलं नाही. म्हणूनच मिती चार, कल्याण आणि अस्तित्व, मुंबई यांच्या माध्यमातून सध्या सादर होत असलेला रवींद्र लाखे यांनी दिग्दíशत केलेला प्रिया जामकर अभिनीत सावित्रीचा नाटय़ाविष्कार सावित्रीच्या वाचकांना रंगभूमीकडे खेचून नेतो आहे.
सावित्री ही पत्ररूप कादंबरी. अवघी ४९ पत्रं असलेली. आकार छोटा, पण अवकाश मोठा अशी. आईविना वाढलेल्या, तरुण बुद्धिमान मुलीच्या विचारविश्वाचा, भावभावनांचा पस मांडणारी. सुरुवातीला मुग्ध आणि नंतर परिपक्व होत जाणाऱ्या तिच्या प्रेमाचा प्रवास सांगणारी ही कादंबरी. पण तरीही ती केवळ प्रेमकथा नाही. साऊला अशा कुठल्या चौकटीत बसवताच येत नाही. कारण या बुद्धिमान, स्वतंत्र विचारांच्या, आपल्या स्वातंत्र्याचे मोल जाणणाऱ्या, पण त्यातून येऊ शकणारा बंडखोरपणा, बेबंदपणाचा लवलेशही नसणाऱ्या, अत्यंत संवेदनशील, कलासक्त, काळाच्या कितीतरी पुढे असलेल्या, वसुधवकुटुम्बकम् वृत्तीच्या आणि प्रेम या संकल्पनेला कितीतरी व्यापक रूपात पाहणाऱ्या अशा मुलीच्या जगण्याचा पटच विलक्षण आहे. तिच्याच वडिलांच्या शब्दात सांगायचं तर ती आनंदभाविनी आहे. आपल्याला मोर हवा असेल तर आपणच मोर व्हायचं, आपल्याला जे जे हवं ते आपणच व्हायचं ही तादात्म्यता तिच्यात आहे, पण असं एकरूप होतानाही आपलं मीपण हरवू न देण्याचं भानही तिच्याकडे आहे. आनंदी, खेळकर, विचारी, तीक्ष्ण विनोदबुद्धी असलेली, विचक्षण, धीट, उत्कट अशी ही तरुण मुलगी आहे.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

एका प्रवासात भेटलेल्या तरुण, बुद्धिमान सुहृदाशी तिचा स्वत:हून संवाद सुरू झाला आहे. म्हणजे कोणत्या तरी ऊर्मीतून तिनेच पुढाकार घेऊन त्याला पत्रं लिहिलं आहे. त्याचंही तेवढय़ाच तत्परतेने उत्तर आलं आहे आणि दोन्ही बाजूंनी संवादाची तितकीच असोशी आहे, हे दोघांनाही मनोमन उमजलं आहे. पण ही सगळी पत्रं सावित्रीने लिहिलेली आहेत. त्यामुळे तिच्या त्याला उत्तर देणाऱ्या प्रत्येक पत्रातून त्याने त्याच्या पत्रात काय लिहिलं असेल याचा वाचक फक्त अंदाज करू शकतो. त्यामुळे तिची उत्कटता कळते तशी त्याची कळत नाही. पण सावित्रीचं मन त्याला जाणवलंय आणि त्यालाही अशाच बुद्धिमान संवादाची ओढ आहे, हे तिच्या प्रतिसादात्मक पत्रांमधून जाणवतं राहतं.

कादंबरीतला हा दोघांचा पत्ररुपी संवाद घडतो साठपासष्ट वर्षांपूर्वी. पत्र हे दूरस्थ संवादाचं प्रमुख माध्यम असतानाच्या काळात. आजच्या क्षणाक्षणाला अवघ्या जगाशी जोडलं जाऊ शकणाऱ्या काळातल्यांना संवादाच्या त्या तीव्रतेचा अंदाजही येणार नाही कदाचित, पण मनातलं कागदावर उतरवून कुणा त्रयस्थामार्फत पलीकडच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणं आणि त्याच्याकडून पुन्हा उत्तर येणं ही जितकी वेळ घेणारी प्रक्रिया होती, तितकीच गुंतवून ठेवणारीही होती. सावित्रीने तर प्रत्येक अक्षर न अक्षराला शास्त्र-काटय़ाची कसोटी लावलेली. आपलं मन उघडं करायला उत्सुक असलेली; पण तरीही त्याला जोखू पाहणारी, त्याच्या सहवासासाठी आतुरलेली पण आपली पायरी जराही न उतरणारी, तरल आणि तितकीच सजग अशी ही सावित्री. तिच्या प्रेमाच्या कल्पनेत तो एकटा नाहीये तर तिच्या सगळ्या अवकाशासह तिला त्याला आपलंसं करून घ्यायचंय. आणि हा प्रवास फक्त प्रेमातल्या समर्पणाचा नाही तर आत्मशोधाचाही आहे. तिरुपेट, कुर्ग इथून तो सुरू होतो आणि आठ वर्षांनी तिथेच त्याचं वर्तुळ पूर्ण होतं. पण या आठ वर्षांच्या काळात विस्तारत आणि विकसित होत गेलेलं सावित्रीचं जगणं, तिच्यातली परिपक्वता या सगळ्याचा एक सुंदर आलेखच पु. शि. रेगे यांनी चितारला आहे. तिचे वडील म्हणजे आप्पा, त्यांचे मित्र प्रो. एजवर्थ, तिला सांभाळणरी राजम्मा, लच्छी, तिला जपानमध्ये भेटलेली जीवलग मत्रीण ल्योरे, मेजर सेन, त्यांची पत्नी, त्या दोघांच्या निधनामुळे पोरकी झालेली त्यांची लेक बिना ही सगळी सावित्रीची आपली माणसं आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्यापुढे सावित्रीचं व्यक्तिमत्त्व उभं राहात जातं.

कादंबरीचं नाटय़रूपांतर हा प्रकार मराठीला नवीन नाही. पण कादंबरीच्या पारंपरिक फॉर्मचं रूपांतरही तुलनेत सोपी गोष्ट. इथे सावित्री या कादंबरीमध्ये आहेत ती उमलत्या वयापासून परिपक्वतेपर्यंत प्रवास करणाऱ्या एका तरल मनाच्या स्त्रीची ४९ पत्रं. तिच्या आयुष्यातल्या व्यक्तींबद्दल ती त्याला लिहीत असली तरी ही सगळी कादंबरी तिची एकटीचीच. त्यामुळे तिचं नाटय़रूपांतर म्हणजे एकपात्री प्रयोगच असायला हवा. त्यासाठी जवळजवळ दीड तास प्रेक्षकांना खिळवून ठेवता यायला हवं. दिग्दर्शक रवींद्र लाखे आणि सावित्री सादर करणाऱ्या प्रिया जामकर यांनी तो कमालीच्या ताकदीने पेलला आहे. रवींद्र लाखे यांच्याबद्दल सांगायचं तर ते गेली ४० वष्रे प्रायोगिक नाटकांच्या क्षेत्रात काम करत आहेत. विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, शफाअत खान, श्याम मनोहर या नाटककारांची नाटकं त्यांनी बसवली आहेत. ते सांगतात, चाळीस वर्षांपूर्वी जेव्हा मी सावित्री ही कादंबरी वाचली तेव्हापासून तिचं नाटय़रूपांतर करायचं असं माझं स्वप्नच होतं. पण सावित्री सादर करण्याची समज असलेली, त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असलेली कलाकार मला मिळत नव्हती. प्रिया जामकरकडे ती समज, ताकद आणि इच्छा आहे, असं जाणवल्यावर मी सावित्रीसाठी दीड वर्षांपूर्वी तिला विचारलं आणि आमचा हा प्रवास सुरू झाला.
सावित्री सादर करणारी प्रिया जामकर पुण्याच्या एसएनडीटी महाविद्यालयात मराठीची विभागप्रमुख आहे. ती गेली अनेक वष्रे शमा भाटे यांच्याकडे कथक शिकते आहे. तिने दिग्दर्शक सुमित्रा भावे यांच्याबरोबर कमल देसाई यांच्या कथेच्या सह्य़ाद्रीवरील सादरीकरणात भाग घेतला आहे. मुळात ती अत्यंत संवेदनशील कवयित्री आहे. अत्यंत बोलके डोळे, लवचिक आवाज, नृत्याची जाण असल्यामुळे लयबद्ध हालचाली, कवयित्री असल्यामुळे सावित्रीमधली तरलता समजून घेण्याची क्षमता आणि अभिनयाची मुळातच असलेली आवड या सगळ्या गोष्टी तिला सावित्री पेलण्यासाठी जमेच्या ठरल्या आहेत.

मुळात हा सगळा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी साधलेला संवाद. तो निव्वळ नाटय़वाचन या स्वरूपात न करता एकपात्री प्रयोग या स्वरूपात सादर केला आहे. रंगमंचावर जवळजवळ दीड तास एकच व्यक्ती वावरणार असते तेव्हा सगळ्या गोष्टी तिच्यावरच आवलंबून असतात. तिचा वावर, तिच्या हालचाली, तिचा आवाज, तिचा अभिनय या सगळ्याच गोष्टींवर प्रेक्षकांचं लक्ष केंद्रित झालेलं असतं. या सगळ्याच बाबतीत सावित्री अशीच असणार असं वाटावं या ताकदीने प्रिया सावित्री सादर करते. तिला मात्र वाटतं की अजूनही आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे. ती म्हणते की दर प्रयोगागणिक आम्हाला त्यातल्या वेगवेगळ्या, नवनवीन शक्यता दिसत, जाणवत राहतात. तिच्या सादरीकरणाचं कौतुक होत असलं तरी ती त्याचं तेवढंच श्रेय दिग्दर्शक रवींद्र लाखे आणि बाकीच्या टीमचं असल्याचं सांगते.
सावित्री वाचणं हा एक वेगळा अनुभव आहे आणि तिचा नाटय़ाविष्कार बघणं हा पूर्ण वेगळा अनुभव आहे. हे दोन्ही अनुभव आपापल्या पातळ्यांवर आपल्याला अधिकच समृद्ध करतात.

मिती-चार, कल्याण निर्मित आणि अस्तित्व मुंबई प्रस्तुत एकपात्री दीर्घाक- सावित्री
लेखक    : पु. शि. रेगे
रंगावृत्ती, दिग्दर्शन, नेपथ्य : रवींद्र लाखे
प्रकाश    : मकरंद मुकुंद
साहाय्यक : हृषीकेश वायदांडे, सिद्धेश गिरी
संगीत     : कौशल इनामदार
ध्वनी आणि ध्वनी नियोजन : प्रीतिश खंडागळे,
साहाय्यक : संदेश पडवळ
नृत्य :    मनीष पाठक
रंगभूषा : महेंद्र झगडे
वेशभूषा    : शुभा गोखले, शीतल ओक
केशभूषा    : अश्विनी लेले
रंगमंच व्यवस्था : अश्विनी भांडारी, हिमांशू केदार, आदर्श गांगुर्डे, सिद्धेश गिरी, ऋणाली चौधरी.
विशेष आभार :    माणिक शिंदे, मृदुला साठे, राजा महाशब्दे

पाश्र्वसंवाद :
प्रियकर    : अक्षय शिंपी
आप्पा : रवींद्र लाखे
प्रो जोशी: अमोल कुलकर्णी
एजवर्थ : संजय रणदिवे

भूमिका:
सावित्री : प्रिया जामकर

response.lokprabha@expressindia.com