रेश्मा राईकवार

रोमिओ अकबर वॉल्टर

शत्रू देशात जाऊन, आपली खरी ओळख विसरून त्यांच्यातलेच एक व्हायचे आणि तिथून आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली माहिती मिळवून ती देशापर्यंत पोहोचवायची. गुप्तहेर किंवा बॉलीवूडपटांनी प्रचलित केलेला शब्द म्हणजे अंडरकव्हर एजंटच्या कामाचे स्वरूपच मुळात नाटय़मय असते. त्या त्या परिस्थितीनुसार आणि आजूबाजूला असलेल्या व्यक्तींनुसार त्यांच्यासमोरची आव्हाने अधिकच कडवी होत जातात. त्या अर्थाने खरोखरच घरदार विसरून देशासाठी कार्यरत असणाऱ्या गुप्तहेरांच्या कार्याची ओळखच जगाला होऊ शकत नाही. त्यांच्या मनात चालणारा कल्लोळ, कामाचा ताण, केवळ कर्तव्यबुद्धीने वावरतानाही आतून माणुसकीच्या जाणिवेने खंगत जाणारा त्यांचा आक्रोश गेल्या काही वर्षांत अनेक हिंदी चित्रपटांनी आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ ही त्यात पडलेली भर..

रॉबी ग्रेवाल दिग्दर्शित, ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ सत्यघटनेवरून प्रेरित आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धात ज्या गुप्तहेराची आपल्याला मोलाची मदत झाली होती, त्याच्या कथेवरून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटात येणारा काळ हा ७१ च्या आसपासचा आहे. विविध रूपे घेऊन रंगमंचावर हुबेहूब व्यक्तिरेखा साकारणारा रोमिओ अली (जॉन अब्राहम) हा साधा बँकेत काम करणारा कर्मचारी. चटकन रूप बदलण्याचे त्याचे तंत्र ‘रॉ’चे (रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग) प्रमुख श्रीकांत राय (जॅकी श्रॉफ) यांच्या नजरेत भरते. रोमिओला पूर्ण प्रशिक्षण देऊन, पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवले जाते. तिथून तीन महिन्यांच्या आत तो कराचीत पाकिस्तानी सैन्यासाठी शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या मोठय़ा कंत्राटदाराचा विश्वासू म्हणून वावरू लागतो. रोमिओचा व्हाया अकबर वॉल्टपर्यंत झालेला नाटय़मय प्रवास दिग्दर्शक आपल्याला दाखवतो. मात्र, हा प्रवास देशासाठी खूप हितकारक असला तरी गुप्तहेर संकटाच्या वेळी कोणत्याच देशाचा नसतो. त्याला मरण पत्करण्याशिवाय पर्याय उरत नाही, यावरही दिग्दर्शकाने बोट ठेवले आहे.

दिग्दर्शक म्हणून रोमिओच्या माध्यमातून रॉबी ग्रेवाल जेव्हा या गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडतात तेव्हा त्या त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन नाहीत, या गोष्टी लक्षातच घेतलेल्या नाहीत. ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ या चित्रपटाची कथा १९७१ च्या आधीची आहे. त्यामुळे अर्थात, त्यावेळचा काळ रंगवणे हे मुख्य आव्हान होते. तो काही प्रमाणात बेल बॉटम पँट्स, केशरचना आणि अन्य गोष्टीतून पूर्ण करण्याचा प्रयत्न क रण्यात आला आहे. जो पूर्णत: फसलेला नसला तरी पुरेसा प्रभावही पाडत नाही. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या घटना, काही घटनांमध्ये जाणीवपूर्वक गोंधळाची परिस्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या सोडलेल्या घटनांची त्या त्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून येणारी कारणमीमांसा हा एकूणच प्रकार कंटाळवाणा आहे.

चित्रपटाच्या अखेरच्या प्रसंगाने तर यात कळसाध्याय गाठलेला आहे. या प्रसंगातील रहस्य अधिक उठावदार करण्यासाठी संपूर्ण घटनांचे विश्लेषण हे अखेरच्या काही क्षणांत होते. पण रॉचे मावळते प्रमुख आणि त्यांचा उजवा हात मानला जाणारा, त्यांच्या पश्चात त्यांच्या पदावर बसण्यासाठी लायक उमेदवार असलेल्या व्यक्तीला झाल्या प्रकाराची माहितीच नसणे, त्याला त्याच्या प्रमुखांनी अरे तेव्हा मी हे केले होते म्हणून आज ते घडले.. अशापद्धतीचा असे सांगणे ही गोष्टच हास्यास्पद आहे. समोरच्या प्रेक्षकाला काहीच कळत नाही, असे गृहीत धरून केलेली ही मांडणी चित्रपटभर असल्याने मूळ कथा चांगली असूनही त्याचा प्रभाव पडत नाही.

या चित्रपटात रोमिओची भूमिका अभिनेता जॉन अब्राहम याने चोख केली आहे. मात्र, जॉनला प्रेक्षकांनी अशा भूमिकांमधून कित्येक वेळा पाहिले असल्याने नावीन्य काहीच नाही. तुलनेने जॅकी श्रॉफ यांचा श्रीकांत राय उजवा वाटतो. रघुवीर यादव आणि अमजद अली खान यांचा मुलगा शादाब खान याचा चेहरा लक्षात राहतो. गाणीही फारशी प्रभाव पाडणारी नाहीत. त्यामुळे एकुणातच रॉचा कारभार, त्यांची लोकांना निवडण्याची पद्धत, शत्रूकडून रहस्य मिळवण्यासाठीचे डावपेच आणि त्याभोवतीने येणारा मानसिक संघर्ष या सगळ्या गोष्टी ‘रोमिओ अकबर वॉल्टर’मध्ये पाहायला मिळतात. मात्र या चित्रपटापेक्षा याआधी येऊन गेलेले चित्रपट जास्त चांगले होते, असेच म्हणावे लागेल.

* दिग्दर्शक – रॉबी ग्रेवाल

* कलाकार – जॉन अब्राहम, जॅकी श्रॉफ, रघुवीर यादव, सुचित्रा कृष्णमूर्ती, शादाब अमजद खान, मौनी रॉय, राजेश शृंगारपुरे.