महान दिग्दर्शक सत्यजित रे यांच्यावर आधारित चार जबरदस्त कहाण्या तुमचं मन जिंकण्यासाठी सज्ज आहेत. एंथोलॉजी सीरिज ‘रे’ चा नुकतंच ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. हा ट्रेलर पाहून सीरिजमध्ये वेगवेगळे प्रयोग वापरण्यात आल्याचं दिसून येतंय. इमोशनल ड्रामा, ट्विस्ट अ‍ॅण्ड टर्नने भरलेल्या या सीरिजचा पहिला सीजन येत्या २५ जून रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येणार आहे. या सीरिजच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे.

भारतीय चित्रपट ज्यांच्या नावानेच सुरू होतो ते म्हणजे महान दिग्दर्शक सत्यजित रे होय. सिनेमाला जमिनीशी जोडणारी, मानवी भावभावना व जगण्याची नितांत सुंदर नक्षी रुपेरी पडद्यावर चितारणारे असे किमयागार सत्यजित रे यांच्या कहाण्या घेऊन नेटफ्लिक्सने ‘रे’ या एंथोलॉजी सीरिजची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती. त्यानंतर आज या सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. एंथोलॉजी सीरिज ‘रे’ मध्ये चार वेगवेगळ्या कहाण्या, तीन दिग्दर्शक आणि दोन लेखकांच्या क्रिएटीव्हीटीचा मिलाप पहायला मिळणार आहे. या सीरिजमध्ये सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता मनोज वाजपेयी याच्यासह अली फजल, केके मेनन, हर्षवर्धन कपूर आणि राधिका मदान हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

या सीरिजमधला मुख्य भूमिकेतला कलाकार अली फजल याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर हा ट्रेलर रिलीज केला. सूड, स्वाभिमान, मत्सर, विश्वासघात या भावनांची झलक या ट्रेलरमध्ये दिसून आली.

सत्यजीत रे यांच्या चार जबरदस्त कहाण्यांचे फ्यूजन

या सीरिजमध्ये ‘फरगेट मी नॉट’, ‘हंगामा है क्यू बरपा’, ‘बहुरूपिया’ आणि ‘स्पॉटलाइट’ चार टायटलच्या कहाण्या दाखवण्यात येणार आहेत. यात प्रेम, वासना, विश्वासघात आणि सत्यता या भावनांना वेगळ्याच रूपातून सादर करण्यात आलंय. अभिषेक चौबे, श्रीजित मुखर्जी, वसन बाला यांच्या या कहाण्यांमध्ये मनोज बाजपेयी, गजराव राव, अली फजल, केके मेनन, हर्षवर्धन, आकांक्षा रंजन कपूर, श्वेता बसु प्रसाद यांचे अभिनय सोन्याहून पिवळे ठरणार आहे.

अली फजल यांच्या ‘फॉरगेट मी नॉट’ सीजनमध्ये एका उद्योजकाची कहाणी दाखवली आहे. यात एक शार्प मेमरी असलेला आणि कोणतीच गोष्ट विसरत नसलेला उद्योजक दाखवण्यात आलाय. हर्षवर्धन कपूरच्या ‘स्पॉटलाइट’ सीजनमध्ये एका कलाकाराची कहाणी दाखवण्यात आली आहे. यात कलाकार हा टाइपकास्टच्या कामाला कंटाळून स्वतःला एक उत्तम कलाकार म्हणून सिद्ध करण्याच्या प्रयत्न असलेला दाखवण्यात आलेला आहे. केके मेननच्या ‘बहूरूपिया’ मध्ये एका मेकअप आर्टिस्टची कहाणी दाखवण्यात आली आहे. यात एक चांगल्या कम्प्यूटर फर्ममध्ये काम करत असताना स्वतःला मेकअप आर्टिस्टच्या दुनियेपासून दूर करू न शकणाऱ्या एक व्यक्तीचा संघर्ष दाखवण्यात आलाय. तसंच अभिनेता मनोज वाजपेयीच्या ‘हंगामा क्यों है बरपा’ सीजनमध्ये मुसाफिर अली नावाच्या एका गजल गायकाची कहाणी दाखवण्यात आली आहे.

या सीरिजचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. सत्यजित रे यांच्या कहाण्या आजही लोकांच्या मनात बसल्या आहेत. आता त्यांच्यावर केल्या गेलेल्या एव्हरग्रीन कहाण्यांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.