मकरंद अनासपुरे, अभिनेते
लहानपणी चंपक, चांदोबा अशा पुस्तकांनी वाचनाचा छंद जडला. माझे मामा शरद निलंगे हे प्रकाशक. त्यामुळे साहजिकच आजोळी राहायला गेल्यावर माझा वेळ वाचनामध्ये व्यतीत होऊ लागला. कारण घरातच खूप पुस्तके असायची. चौथीत असताना मी ‘मृत्युंजय’ वाचले. तिथून माझी वाचनाची आवड वाढत गेली. तेव्हापासून आजपर्यंत माझे वाचनाचे वेड कायम राहिलेले आहे. अजूनही मी स्वत: पुस्तके खरेदी करण्यासाठी दादर, ठाण्याच्या मॅजेस्टिकमध्ये जातो. वयाच्या विविध टप्प्यावर वाचनाची आवड वाढत आणि बदलत गेली.
लहानपणी चंपक, चांदोबा यामध्ये रमणारा मी कालांतराने सुहास शिरवळकर, मंदार पटवर्धन, दा.रा.बुलंद या लेखकांची पुस्तके वाचायला लागलो. सुरेंद्र मोहन पाठक यांची डिटेक्टिव्ह पुस्तके खूप वाचली. वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आल्यावर प्रकाश नारायण संत यांचे ‘चतुष्टक’ वाचले. भालचंद्र नेमाडेंचे साहित्य हाती पडल्यावर नेमाडेंची अनेक पुस्तके वाचली. वाचनाची सवय बदलून मी अनुवादित पुस्तके वाचली. त्यात जेफ्री आर्चर, सिडने शेल्डन यांची पुस्तके वाचली. अनुवादित साहित्यामध्ये मला डॉ. रॉबिन कुक यांच्या कादंबऱ्या वाचायला खूप आवडतात.
राजन गवस, सदानंद देशमुख, राजन खान यांचे साहित्य वाचायला आवडते. वैचारिक साहित्य मला जास्त वाचायला आवडत नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या विचारांचा प्रभाव आपल्यावर पडण्याची शक्यता असते. आपल्या अनुभवातून आपले आयुष्य वृद्धिंगत व्हायला हवे. हल्ली वृत्तपत्रात खूप चांगले वाचायला मिळते. सतीश आळेकरांचे ‘गगनिका’, अमृता सुभाषचे ‘एक उलट, एक सुलट’, दासू वैद्य यांचे सदर मी नियमित वाचायचो. रंगनाथ पाठारे यांचे साहित्य वाचतो. याशिवाय आध्यात्मिक विषयासंदर्भात कुणाचे अनुभव असतील तर ते वाचायला आवडतात. भारताच्या आध्यात्मिक रहस्याच्या शोधात हे पॉल ब्रंटन यांचे पुस्तक, हिमालयाच्या सिद्धयोग्यांविषयीचे पुस्तक असे विविध प्रकारचे साहित्य वाचनात कायम असते. परमहंस परमयोगानंद यांचे ‘ओटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ वाचले. खूप प्रकारची पुस्तके संग्रहात आहेत.
मला पुस्तके लोकांना भेट द्यायला आवडतात. त्यात संदीप वासलेकरांचे ‘एका दिशेचा शोध’ या पुस्तकाच्या खूप प्रती वाटल्या. वीणा गवाणकरांची पुस्तके वाटतो. अनेक पुस्तके मित्रांना, ग्रंथालयाला भेट दिली. मात्र केवळ वाचनाची आवड असल्याने आजही माझे पुस्तकांचे कपाट भरलेले आहे. दलित आत्मकथनपर चरित्रात्मक पुस्तके वाचली. अक्करमाशी, उचल्या, दया पवारांचे बलुतं, लक्ष्मण माने यांचे उपरा अशी पुस्तके वाचली. कथा प्रकारात मला भाऊ पाध्ये, श्री.दा.पानवलकर यांच्या कथा आवडतात. ‘तोतो चांद’ हे एका जपानी स्त्रीने लिहिलेले पुस्तक वाचल्यावर खूप भारावून गेलो. प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे. हे पुस्तक माझ्याकडे नव्हते. पण मी ते शोधले. ‘जेफ्री आर्चर’चे क्रिफ्टन क्रोनिकल हे अनुवादित पुस्तक मिळविण्यासाठी मी सतत मॅजेस्टिकच्या फेऱ्या मारल्या. ग्रामीण साहित्य वाचले. ऐतिहासिक साहित्य प्रकारात श्रीमानयोगी, मृत्युंजय, पानिपत अशी पुस्तके वाचली. यामुळे एकाच साहित्य प्रकाराचे वाचन न होता सर्व तऱ्हेचे साहित्य वाचले. अलीकडे काही नटांनी लिहिलेली पुस्तके वाचली. त्यात चार्ली चॅपलिनची पुस्तके, भा.द.खेरांचे हसरे दु:ख, श्रीराम लागू यांचे लमाण, विजयाबाईंचे झिम्मा अशी पुस्तके वाचली. सत्यजित रे यांची फिलुदाची मालिका आपल्याला तरुण ठेवणारी पुस्तके आहेत. भैरप्पांची पुस्तके वाचायला खूप आवडतात. काठ, तंतू, पारखा ही त्यांची पुस्तके अतिशय वाचनीय आहेत. त्यामुळे या सर्व तऱ्हेच्या वाचनाचा निश्चितच उपयोग होतो. अभिनयात एखादे पात्र उभे करायचे असते. एखादी भूमिका साकारल्यानंतर ती खरी वाटणे हे केवळ वाचनातून साध्य होते. जर साहित्य मूल्य नसेल तर कलाकार भूमिका साकारताना केवळ लेखकाने दिलेल्या भूमिकेतच अडकून राहील. म्हणून मला अभिनेता म्हणून वाचन करावेसे वाटते. वाचन हे व्यसन असावेच. कितीही व्यग्र असलो तरी मी दररोज झोपताना वाचतो. कारण वाचनाला पर्याय नाही. अनेक लेखकांनी सही करून दिलेली पुस्तके संग्रही आहेत. संग्रहातील कोसला कादंबरीवर नेमाडेंची सही आहे. एखादे पुस्तक आपल्याकडे नाही हे लक्षात आल्यावर अस्वस्थ होतो. त्यामुळे मी ते पुस्तक खरेदी करतो. मला इतर भेटवस्तू कुणी दिल्या तर मला नाही आवडत, पण एखाद्याने पुस्तक भेट दिले तर आनंद होतो.

अभिनयात एखादे पात्र उभे करायचे असते. एखादी भूमिका साकारल्यानंतर ती खरी वाटणे हे केवळ वाचनातून साध्य होते. जर साहित्य मूल्य नसेल तर कलाकार भूमिका साकारताना केवळ लेखकाने दिलेल्या भूमिकेतच अडकून राहील. म्हणून मला अभिनेता म्हणून वाचन करावेसे वाटते. वाचन हे व्यसन असावेच. कितीही व्यग्र असलो तरी मी दररोज झोपताना वाचतो. कारण वाचनाला पर्याय नाही.
– मकरंद अनासपुरे