रजनीकांतचा चित्रपट म्हणजे रंजनाची संपूर्ण हमी. एवढेच त्याच्या चाहत्यांना पुरते. भारतीय चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा आज (शुक्रवार) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बॉक्स ऑफिसवर रजनीकांतचा ‘कौचादैयान’ हा थ्री डी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ऐतिहासिक टच असलेल्या या चित्रपटामध्ये रोमान्स, अॅक्शन सिक्वेन्सची जुगलबंदी अनुभवायला मिळणार हे नक्की.
इरॉस इंटरनॅशनल मिडीया एन्टरटन्मेंटची निर्मिती असलेला ‘कौचादैयान’चे दिग्दर्शन रजनीकांतची कन्या सौदर्यां रजनीकांत अश्विनने केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच ‘फोटोरिअलास्टिक’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, कौचादैयान’मध्ये रजनीकांतच्या जोडीला दीपिका पदुकोण, आर. शरथ कुमार यांच्यासुद्धा प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट सहा भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच जगभरात ६,००० ठिकाणी प्रदर्शित होणारा हा सिनेमा प्रेक्षकांना टू-डी आण थ्री-डी या दोन्ही तंत्रांच्या सहायाने बघता येईल. हा चित्रपट का पाहावा याची कारणे-
१.रजनीकांत- सिर्फ नाम ही काफी है. रजनीकांतचा चित्रपट म्हटल की त्यात १०० टक्के मनोरंजनाची हमी असते. तब्बल तीन वर्षांनंतर रजनीकांत रुपेरी पडद्यावर परत आले आहेत.
२.दीपिका पादुकोण- बॉलीवूड सुंदरी दीपिका पादुकोणचा या वर्षातील हा पहिलाच चित्रपट आहे. गेल्यावर्षी पाठोपाठ चार हिट चित्रपट देणारी दीपिका ही रजनीकांतशी रोमान्स करताना दिसणार आहे. यात तिने क्षत्रिय राजकन्येची भूमिका केली आहे. या चित्रपटानंतर तिचे हॅपी न्यू इयर आणि फाइन्डिग फॅनी फर्नांडिस हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
३.कारण हा कार्टूनपट नाही- कोचादैयानच्या दिग्दर्शकाच्या नजरेतून हा चित्रपट अॅनीमेटेड असला तरी कार्टूनपट नाही. यात तिने ‘फोटोरिअलास्टिक’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान हॉलीवूडच्या अॅडव्हेंचर ऑफ टिन टिनमध्येही वापरण्यात आले होते. पहिल्यांदाच भारतीय चित्रपटसृष्टीत या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.
४.सौंदर्या आर अश्विन- रजनीकांतची मुलगी सौंदर्या या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. तिच्या कामाची प्रशंसा बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनीही केली आहे.
५. तिनपट मजा- या चित्रपटात रजनीकांत यांच्या तिहेरी भूमिका असल्यामुळे प्रेक्षकांना तिनपट मजा मिळणार आहे. रजनीकांत यांनी नीडर क्षत्रिय राजाची भूमिका साकारली आहे.
६.कारण रजनीकांतला आवडे….माइन्ड इट- आपल्याला राजा आणि राणी यांवरचे चित्रपट आवडत असल्याचे एकदा रजनीकांत यांनी सांगितले होते. ते म्हणाले होते की, मला राजा आणि राणी यांच्यावरच्या आणि कोणा एकेकाळी.. अशी सुरुवात होणा-या कथा आवडतात.
७.पिता आणि पुत्राची टक्कर- जॅकी श्रॉफनेही या चित्रपटात काम केले आहे. त्याचसोबत जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर हादेखील हिरोपन्ती चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्यामुळे या पितापुत्राची बॉक्स ऑफीसवर टक्कर पाहायला मिळणार आहे.
८.ए.आर.रेहमान- कोचादैयानचे संगीत ऑस्कर पुरस्कार विजेता ए.आर.रेहमानने दिले आहे. संगीताने प्रसिद्धीनंतर अवघ्या काही तासातच ‘आय-ट्युन्स’वर धुमाकुळ घातला होता. चित्रपटाच्या संगीताने अनावरणानंतर काही काळातच ‘आय-ट्युन्स’वर भारतीय संगीत विभागात सर्वात वरचे स्थान पटकावले होते.