बदललेली जीवनशैली आणि समाजजीवन, तरुण पिढीचा इंग्रजी भाषेकडे वाढलेला ओढा आणि मराठी माध्यमाऐवजी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश घेण्याची पालकांची मानसिकता या बदलाचे चित्र मराठी चित्रपटात उमटायला लागले आहे. मराठी चित्रपटांचे फक्त विषयच बदलले नाहीतत तर चित्रपटांची ‘नावे’ही बदलली आहेत. गेल्या दोन-चार वर्षांपासून मराठीत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची नावे इंग्रजीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यामुळे ज्याला चित्रपटांविषयी काहीही माहिती नाही, त्याला चित्रपटांच्या नावावरून तो मराठी नव्हे तर इंग्रजी चित्रपट आहे, असे वाटू शकते. म्हणजे चित्रपट मराठी आणि नाव मात्र इंग्रजीत, असा प्रकार सुरु झाला आहे. ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ आणि ‘हॅप्पी जर्नी’ ही गेल्या आठ-पंधरा दिवसातील उदाहरणे. चित्रपटांना इंग्रजी नाव देण्याचा बॉलिवूडमधील कल आता मराठीतही येऊ लागला आहे. हिंदीत अलिकडेच ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘जब वुई मेट’, ‘आय हेट लव्ह स्टोरी’, शुट आऊट अ‍ॅट वडाला’, ‘स्पेशल २६’, ‘ओ माय गॉड’ असे इंग्रजी नाव असलेले हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले होते.
मराठीत अलिकडच्या काही वर्षांत चित्रपटाचे नाव पूर्णपणे इंग्रजीत किंवा अर्धे मराठी आणि अर्धे इंग्रजी, असे ठेवण्याचा कल वाढू लागला आहे. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘बीपी’, ‘टाईमपास’, ‘यलो’, पोश्टर बॉईज’, ‘ए रेनी डे’, ‘कॅम्पस कट्टा’, ‘लिमिटेड माणुसकी’, ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘रेस्टॉरंट’ ही त्याचीच आणखी नावे. नावांच्या या बदलाविषयी ‘वृत्तान्त’शी बोलताना प्रसिद्ध दिग्दर्शक समीर पाटील म्हणाले, बदलत्या जीवनशैलीची जी भाषा झाली आहे, त्याचे प्रतिबिंब चित्रपटाच्या नावातून उमटत आहे असे वाटते. मात्र उगाच अट्टाहास म्हणून इंग्रजी नाव ठेवू नये आणि चित्रपटाच्या कथानकाशी ते नाव मिळतेजुळते असायला पाहिजे. तसेच जे नाव ठेवले जाईल ते प्रेक्षकांना भावणे आवश्यक आहे. माझ्या ‘पोश्टर बॉईज’चे उदाहरण घेऊया. मराठीत भीत्तीपत्रक असा शब्द असला तरी आपण बोलताना सर्रास पोष्टर असेच म्हणतो. चित्रपटाचे नाव ‘भीत्तीपत्रकावरील मुले’ असे ठेवले असते तर ते कळलेही नसते..

इंग्रजी नावांचे आगामी काही चित्रपट
‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘मिसमॅच’, ‘इश्क वाला लव्ह’ ‘ब्लॅक बोर्ड‘, ‘आयपीएल’