बाजीराव आणि मस्तानीची प्रेमकथा पहिल्यांदाच भव्यदिव्य पध्दतीने रुपेरी पडद्यावर आणण्याची महत्वाकांक्षा दिग्दर्शक संजय लीला भन्साळींनी पाहिलं होतं. सलमान-ऐश्वर्या, सलमान-करीना या जोडीपासून सुरू झालेलं त्यांचं हे स्वप्न आता कुठे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या जोडीला घेऊन त्यांनी पूर्ण केलं आहे. या वर्षांच्या अखेरीस प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या प्रसिध्दींनी भन्साळी आणि टीमने चांगलीच कंबर कसली आहे. त्याचा शुभारंभ म्हणून गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर त्यांनी या चित्रपटातील गजाननाची आरती प्रकाशित केली.

पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या जोडीने अनोख्या पध्दतीने हे गाणे प्रकाशित केले. मानवी साखळीचा वापर करून केलेली गणेशाची मूर्ती आणि स्टेडियमच्या मध्यभागी रणवीरने केलेली आणि सुखविंदर सिंगने गायलेली आरती असा हा भव्य सोहळा झाला. सगळ्यात मोठी मानवी साखळी करून केलेल्या या गणेशाकृतीची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. ‘बाजीराव मस्तानी’सारख्या मोठय़ा चित्रपटाच्या प्रसिध्दीची मोठी सुरूवात यापेक्षा वेगळी होऊ शकली नसती. गणपती हे उत्साहाचे प्रतिक आहे आणि चित्रपटाच्या प्रसिध्दीची सुरूवातही त्याच उत्साहाने गजाननाच्या आरतीने झाल्याबद्दल संजय लीला भन्साळींनी आनंद व्यक्त केला.

‘अशी संधी एखाद्यालाच मिळते..’
प्रसिध्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने रणवीर सिंगने उपस्थितांशी संवाद साधला. बाजीरावाची ही भूमिका सर्वार्थाने वेगळी होती. या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. एक काळ गाजवणाऱ्या व्यक्तिची कल्पना करून त्याची भूमिका साकारणे ही सोपी गोष्ट नसते. दिसण्याापासून भाषेपर्यंत सगळ्याच गोष्टी प्रयत्नपूर्वक आत्मसात कराव्या लागल्यात याची कबूली रणवीरने दिली. मात्र, बाजीरावाची कथा ऐकल्यानंतर आपण त्याच्या प्रेमात पडलो. शूरवीर बाजीरावासारखी भूमिका करण्याची संधी दशकातून एखाद्यालाच मिळते आणि ती मला मिळाली याचा खूप आनंद आहे, असेही तो म्हणाला