गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपटसृष्टीचा झपाट्याने विस्तार झाला आहे. विविध विषय हाताळणाऱ्या अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांनी समाजात घडणाऱ्या काही घटनांवर भाष्य केलं आहे. त्यामुळे काळानुसार चित्रपटांचं स्वरुप बदलत असल्याचं पाहायला मिळतंय.त्यातच अनेक नवोदित दिग्दर्शक या क्षेत्रात पदार्पण करत असल्यामुळे त्यांच्या नव्या कल्पना पडद्यावर उमटत आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर चित्रपटांची निर्मिती होताना दिसते. विशेष म्हणजे देशभरामध्ये एकाच दिवशी तब्बल ५२ चित्रपट प्रदर्शित झाल्याचं पाहायला मिळालं.

विविध भाषांत मिळून वर्षभरात सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा देश म्हणून भारताची चित्रपट व्यवसायात ओळख आहे. याचा प्रत्यय ८ फेब्रुवारी रोजी आला. शुक्रवारी एकाच दिवशी देशाच्या विविध भागात मिळून ५२ नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले.
मराठी चित्रपटसृष्टीतील लहान-मोठे मिळून तब्बल ११ चित्रपट प्रदर्शित झाले. सुरुवातीला ९ चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यानंतर दिव्यांग आणि मुंबईचा किनारा हे आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले. मराठी चित्रपटसृष्टीत एकाच वेळी ११ चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

या शुक्रवारी हिंदी चित्रपटसृष्टीतील एकूण आठ चित्रपट प्रदर्शित झाले. त्यात ‘अमावस ‘, ‘फकीर ऑफ व्हेनिस ‘, ‘झोल ‘ ‘दोस्ती के साईड इफेक्ट ‘ इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. त्यासोबतच सहा तमिळ, पाच तेलगू, दोन मल्याळम चित्रपट त्या-त्या राज्यांत प्रदर्शित झाले. या चित्रपटांव्यतिरिक्त भोजपुरी, कन्नड, छत्तीसगड, गुजराती, आसामी, उरिया या प्रत्येक भाषेतील प्रत्येकी एकेक चित्रपट प्रदर्शित झाला. एक कोरियन आणि तीन हॉलिवूड चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आले.

दरम्यान, विविध भाषेत डब झालेले दहा चित्रपट प्रदर्शित असून लहान मोठ्या शहरात वाढलेल्या मल्टीप्लेक्समध्ये आता अशा अनेक चित्रपटांना कमी अधिक प्रमाणात शो मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे.