ऑस्कर नामांकने जाहीर झाल्यानंतर ते ऑस्कर सोहळा सुरू होईपर्यंतच्या काळात उत्सुकता असते ती ‘रेड कार्पेट’ कार्यक्रमाची. ऑस्कर सोहळ्याच्या संध्येला हॉलीवूड व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तारांकित कलाकारांचे आगमन ‘रेड कार्पेट’वर होते. ‘हु दे वेअर’ हे घोषवाक्य वजा प्रश्न या दिवसांत फॅशनसंदर्भातील चर्चाचा मुख्य भाग असतो. विविध फॅशन समीक्षकांकडून या सोहळ्यातील सेलेब्रिटी सौंदर्यवतींनी परिधान केलेला पोशाख आणि एकंदर वेशभूषा याबाबत सविस्तर माहिती आणि परीक्षण केले जाते. म्हणजे प्रत्यक्ष सोहळ्यात पुरस्कार कोणाला? याबद्दल सभागृहात जेवढं नाटय़ रंगतं किंबहुना तितकंच नाटय़ हे रेड कार्पेटवर घडत असतं. त्यामुळे दरवर्षी बदलत जाणाऱ्या या रेड कार्पेटचे रंगढंग या वेळी काय असतील याची ही चाचपणी..

१९२९ पासून अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड म्हणजे ऑस्कर सोहळ्याची सुरुवात झाली. लॉस एंजेलिसमधील हॉलीवूड रुझवेल्ट हॉटेलमध्ये हा सोहळा पहिल्यांदा संपन्न झाला. त्या वेळी त्या सोहळ्याचे स्वरूप मोठे नव्हते. १९६१ पासून ऑस्कर सोहळ्यात रेड कार्पेटची प्रथा सुरू झाली. ‘रेड कार्पेट’चा शब्दश: अर्थ म्हणजे लाल रंगाचा गालिचा, पण इतकेच त्याचे स्वरूप मर्यादित राहिले नाही. हा लाल रंगाचा गालिचा खास तारांकित व्यक्तींसाठी अंथरला जातो. त्याच्या दोन्ही बाजूंना त्यांचे स्वागत करणाऱ्यांची जंत्री असते. छायाचित्रकार, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि मुख्य म्हणजे चाहते यांच्या गर्दीने हा माहौल एक वेगळंच रूप धारण करतो. ‘रेड कार्पेट’ म्हणजे सेलेब्रिटींचा राजेशाही थाट, या राजेशाही थाटाला साजेशी वेशभूषा करत हे सेलेब्रिटी दिमाखात रेड कार्पेटवर चालतात. त्यांचा एकंदर पेहराव, त्यातील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छबी टिपण्यासाठी कॅमेरे सरसावलेले असतात. त्यानंतर काहीच दिवसांत हा पेहराव कोणत्या नामांकित फॅशन डिझायनरने तयार केला आहे, इथपासून त्या सेलेब्रिटीच्या फॅशन सेन्सवर, त्या पेहरावातील प्रत्येक खुबीवर फॅशन समीक्षकांकडून टीकाटिप्पण्या केल्या जातात. ऑस्कर सोहळ्यातील आतापर्यंतचे उत्कृष्ट पेहराव हे त्या सोहळ्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत. फॅशन जगतातील पेहरावांचा सर्वोत्तम नजराणा या सोहळ्याच्या निमित्ताने फॅशन समीक्षक, डिझायनर्स, कलाकार आणि रसिकांसमोर सादर होत असतो. यातील फॅशनचा पुढील अनेक वर्षांमधील फॅशनवर प्रभाव दिसून येतो. ही फॅशन काळानुरूप कशी बदलत गेली, त्याच्यातील सर्वात गाजलेले पेहराव कोणते याचा आढावा घेतला तर तारांकित फॅशनला थेट मार्केटपर्यंत नेणाऱ्या या रेड कार्पेटचे महत्त्व लक्षात येते.

एडिथ हेड हे स्वत: ऑस्कर अ‍ॅवॉर्ड विजेता वेशभूषाकार. १९९५ मध्ये झालेल्या ऑस्कर सोहळ्यात त्यांनी डिझाईन केलेल्या सिलेडॉन सॅटिन गाऊनमध्ये ग्रेस केली ही अभिनेत्री अत्यंत सुंदर दिसत होती. त्या सोहळ्यात ग्रेस केली हिला ‘द कंट्री गर्ल’ या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. या सोहळ्यात डिझाईन केलेले पेहराव हे त्या सोहळ्याच्या दिमाखाला साजेसे असतील याची पूर्ण खबरदारी डिझायनर्सकडून घेतली जाते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे लुपिता नियाँग या अभिनेत्रीचा ‘प्रादा’ या नामांकित फॅशन ब्रँडने डिझाइन केलेला ड्रेस. फिकट निळ्या रंगातील डिस्ने प्रिन्सेसला शोभेल असा हा सुंदर ड्रेस धारण करून ती उत्तमरीत्या रेड कार्पेटवर वावरली होती. या पेहरावाची जादू फॅशन जगतावर बराच काळ राहिली होती. अभिनेत्री मायकल विलियम्स हिचा २००६च्या ऑस्कर सोहळ्यातील वेरा वाँग या अमेरिकेतील प्रसिद्ध फॅशन डिझायनरने डिझाईन केलेला ड्रेसही अत्यंत आकर्षक आणि चर्चेचा विषय ठरला होता. त्यातील कॅनरी यलो रंगावर मायकल विलियम्स हिने लावलेली गडद लाल रंगाची लिपस्टिक तिच्या पेहरावावर उठून दिसत होती. अभिनेत्री निकोल किडमॅन हिने १९९७च्या ऑस्कर सोहळ्यात परिधान केलेला ख्रिस्टन डिओर कॉचर ड्रेस हा ऑस्कर फॅशन इतिहासातील मैलाचा दगड समजला जातो. या सॅटिन ड्रेसवर आशियाई पारंपरिक पद्धतीचे नक्षीकाम केले होते. २००० सालच्या ऑस्करमधील ज्युलिया रॉबर्ट्स हिचा विंटेज ब्लॅक ड्रेस हा ऑस्कर रेड कार्पेट परंपरेला साजेसा असाच. विंटेज ब्लॅक ड्रेसमधील पांढऱ्या रंगाची गळ्याभोवती असणारी पाइपीन हे या ड्रेसचे मुख्य वैशिष्टय़. हेले बेरी ही उत्कृष्ट अभिनेत्री आहेच, पण २००२च्या ऑस्कर सोहळ्यातील तिचा पेहरावही उत्कृष्ट होता. इले साब या लेबनीज फॅशन डिझाईनरने डिझाईन केलेल्या या पेहरावावर हेलेचा पिक्सी हेअरकट शोभून दिसत होता.

ऑस्करचा फॅशन प्रभाव

हे ऑस्कर ड्रेसेस पाहून अनेक फॅशनप्रेमींना तसे पेहराव परिधान करण्याचा मोह होतो, परंतु हे ड्रेसेस खूपच खास म्हणजे केवळ त्याच सोहळ्यासाठी आणि त्या फॅशन डिझायनरने त्याच अभिनेत्रीसाठी तयार केलेले असतात. ते इतर कुठेही मिळत नाहीत. त्यामुळे अगदी तसेच नाही तर त्यांच्यासारखे दिसणारे किंवा त्याच फॅशनचा प्रभाव असणारे ड्रेसेस काही संकेतस्थळांवर विक्रीसाठी उपलब्ध असतात. अर्थात, त्याची किंमतही तितकीच खणखणीत असते. अभिनेत्री अँजेलिना जोली हिने परिधान केलेला मार्क बुवर ड्रेस हा पार्टीवेअर म्हणून, तर लुपिता नियाँग या अभिनेत्रीचा ऑस्कर सोहळ्यातील फिकट निळ्या रंगातील ड्रेससारखा कॉकटेल पार्टी ड्रेस एका ब्रँडने विक्रीसाठी बाजारात आणला होता. मायकल विलियम्सने परिधान केलेल्या २००६ च्या ऑस्कर सोहळ्यातील ड्रेसमधील रंगाचा आणि फॅशनचा प्रभाव असलेला ड्रेसही विक्रीसाठी उपलब्ध झाला होता. आता या ऑस्कर सोहळ्यात असे काही खास लक्षात राहतील असे ड्रेस पाहायला मिळणार की ‘नेमेचि येतो सोहळा’ या नियमाने हाही सोहळा फिका फिकाच जाणार याचं उत्तर फॅशनप्रेमींना याच आठवडय़ात मिळणार आहे.