News Flash

मालवणी बोलीतील पहिला चित्रपट ‘रेडू’

‘ रेडू’ची कथाकल्पना कशी सुचली?

|| मितेश जोशी

मालवणी बोलीतील ‘रेडू’ हा चित्रपट सध्या महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. कोकणी माणसाच्या आयुष्यात एकेकाळी रेडिओला असलेलं महत्व, त्याचं जगणं अशा गोष्टी घेऊन आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक साहज वंजारी यांच्याशी केलेली बातचीत..

  • ‘ रेडू’ची कथाकल्पना कशी सुचली?

‘रेडू’ सिनेमाची मूळ कथा पश्चिम महाराष्ट्रातली होती. चित्रपटाचे लेखक संजय नवगिरे यांच्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. त्यांनीच ही कथा पुढे लिहिली. एके दिवशी चित्रपटाचे निर्माते नवलकिशोर सारडा ही कथा घेऊन माझ्याकडे आले. कथेत ठासून भरलेली निरागसता व मानवी मनाचं  सौदर्य याची भुरळ मला पडली. ही कथा पश्चिम महाराष्ट्रातील रांगडय़ा माणसाच्या आयुष्याभोवती फिरवण्यापेक्षा ती मालवणी माणसाच्या आयुष्याभोवती फिरवूयात अस मला वाटलं. माझ्या या निर्णयामागे दोन कारणे होती, एक म्हणजे कथा वाचत असताना कथेचा नायक मला ‘कोकणची माणसं साधी भोळी’ हे विधान सिद्ध करण्यासाठी योग्य वाटत होता. दुसरं कारण म्हणजे आजपर्यंत संपूर्ण मालवणी भाषेत चित्रित झालेला चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. तो आपण करावा ! म्हणून मी हा चित्रपट मालवणी भाषेत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. पटकथा तर तयार होती. गरज होती ती केवळ कथा मालवणी भाषेत भाषांतरित करण्याची. त्यासाठी मी माझा मित्र लेखक चिन्मय पाटणकरशी बोललो. त्याच्याकडून चित्रपटाची संपूर्ण कथा  नव्या ढंगात मालवणी भाषेत भाषांतरित करून घेतली. कोकण म्हटलं की पाऊ स, आंबा, दशावतार हे सगळं आलं. परंतु या गोष्टी चित्रपटात आम्ही प्रक र्षांने टाळल्या.

  • ‘रेडू’ दिग्दर्शित करत असताना काय वेगळे प्रयत्न करावे लागले?

सिनेमा दिग्दर्शित करत असताना प्रचंड मेहनत घेतली. कथा भाषांतरित करण्यापासूनची तयारी होती. मी मूळचा जळगावचा. शिक्षण व करियर पुण्यात झालं. त्यामुळे माझा मालवण व तेथील बोलीभाषेशी तसा फार काही संबंध नाही. त्यामुळे एक एक शब्द मी स्वत: आधी समजून घेतले. ऑडिशनमधून ५५ कलाकारांची फौज तयार केली. त्यांना ३ महिने आवाज व अभिनयाचं प्रशिक्षण दिल व पुढे चित्रीकरण सुरू केलं. चित्रीकरणाची जागा निश्चित करण्यासाठी आम्ही दापोली ते कुडाळ असा प्रवास केला. त्या प्रवासादरम्यान आमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. चित्रीकरणासाठी विशेष तजवीजदेखील करावी लागली. कारण सध्याचं मालवण आधुनिक झाले असून,आज प्रत्येक गाव प्रसारमाध्यमे आणि विद्युत जाळ्यांमुळे एकमेकांशी जोडली गेली आहेत. त्यामुळे दूरवर पसरलेल्या विजेच्या तारा तसेच दूरदर्शनचे अँटीना दिसू नयेत, यासाठी घनदाट झाडी असलेल्या अज्ञात जागी सेट उभा करावा लागला. चहुबाजूने जंगल आणि निर्मनुष्य अशी ती जागा असल्याकारणामुळे चित्रीकरण संपेपर्यंत संपूर्ण टीमला बाहेरील जगाशी संपर्क करण्याचे कोणतेच माध्यम तेथे उपलब्ध होत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत  फोनवर बोलायचे असल्यास, क्षेत्रात येण्यासाठी किमान दोन तास तरी लांब शहरात जावे लागे. याप्रकारे ‘रेडू’ सिनेमाच सर्व शूटिंग पूर्ण केलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपापले काम अचूक पूर्ण करत सिनेमा करण्यासाठी प्रत्येकानेच योगदान दिले आहे.

  • ‘रेडू’ची नक्की कथा काय आहे?

‘रेडू’ म्हणजे ‘रेडियो’. रेडियोवर अमाप प्रेम करणाऱ्या ७० च्या दशकातील एका सामान्य ग्रामीण युवकाची कथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. त्याकाळी खेडेगावात टीव्ही पोहोचला नसल्यामुळे रेडिओला अधिक महत्व होते. ज्याच्या घरात रेडिओ ते घर श्रीमंत अशी जनमानसात समजूत होती. आणि त्यामुळेच ‘रेडू’ बद्दलची ग्रामस्थांमधील उत्सुकता आणि कुतूहल विनोदी पद्धतीने या सिनेमात मांडण्यात आली आहे.

  • प्रेक्षकांनी रेडू का पहावा? रेडू सिनेमाचं वेगळेपण काय ?

रेडू हा मालवणी बोलीभाषेतला चित्रपट आहे. आजपर्यंत मालवणी बोलीत एखादा अपवाद वगळता फिचर फिल्म झालेली नाही. मालवणी व्यक्तिरेखा अनेक मालिका,नाटक व चित्रपटांमधून अनुभवायला मिळतात. मात्र, त्या भडक आणि विनोदी असतात. रेडू हा चित्रपट त्या पलीकडे जातो. रेडू एका मालवणी माणसाची साधी निरागस गोष्ट सांगतो. कोकणाचा खराखुरा, निसर्गरम्य अनुभव देतो. अनेक कलाकार हे मालवणमधील स्थानिक कलाकार आहेत. त्यामुळे एक रॉनेस या चित्रपटात आहे. आज आपल्या हातात मोबाईल असतो, पण मोबाईलमध्ये व्यवहार भावनेपेक्षा अधिक असतो. रेडिओ हे सत्तरच्या दशकातील भावनेचं माध्यम होतं. हे आजच्या तरुणाईला पटवून देणारा हा चित्रपट आहे. रेडिओ वर या आधी तामिळ भाषेत चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे रेडू हा भारतातील दुसरा रेडिओवर आधारित चित्रपट आहे आणि मराठीतील (मालवणी भाषेतला) पहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 2:30 am

Web Title: redu marathi movie
Next Stories
1 ‘बिग बॉस’च्या घरात दडलंय काय?
2 अभिनय ते दिग्दर्शन मराठी कलाकारांची घोडदौड
3 तरुण प्रेमप्रवास!
Just Now!
X