निलेश अडसूळ

सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी बालपण अनुभलेल्या प्रत्येकाला आज ‘त्या’ जुन्या मालिका आठवत असतील, ज्या पाहात पाहात आपण गृहपाठ पूर्ण केले. अगदी शाळेच्या वह्य़ांवरही त्याच मालिकेतील पात्रांचे चित्र असावे असा आपला अट्टहास असायचा. वॉटरबॅगपासून ते दप्तरांवर प्रत्येक ठिकाणी ही पात्र पाहायला मिळायची. तेव्हा आजसारखे प्रत्येकाकडे टीव्ही नव्हते म्हणून एकाच मित्राच्या घरी गराडा घालून धमाल-मस्ती करत त्या मालिका पाहिल्याचेही अनुभव अनेकांच्या गाठीशी आहेत. मग त्याकाळी आपलं मनोरंजन करणाऱ्या मालिका आज कुठे हरवल्या आहेत, असा प्रश्न पडतो. आणि आजची मुलं जेव्हा कार्टूनच्याही पलीकडे जाऊन सासू-सुनांचे संवाद गुणगुणतात तेव्हा मात्र निश्चितच या प्रकाराचा खेद वाटतो.

अनेकांचे बालपण रम्य करणाऱ्या त्या हिंदी-मराठीतील ‘सोनपरी’, ‘शक्तिमान’, ‘शकलाका बुमबुम’, ‘हातिम’, ‘करिष्मा का करिष्मा’, ‘विक्राल और गबराल’, ‘बोक्या सातबंडे’, ‘दे धमाल’, ‘पंचतंत्र’ या मालिका आजच्या पिढीचं मनोरंजन कारण्यासाठी का नाहीत, असा प्रश्न पडतो. म्हणजे त्याच मालिका परत याव्या किंवा तशाच मालिका पुन्हा बनवाव्यात असे नाही. पण लहान मुलांसाठी, त्यांना आवडेल असं, त्यांच्या विश्वातलं चित्रण दाखवण्यासाठी आज वाहिन्या कुठेतरी कमी पडत आहेत हे मात्र नाकारता येणार नाही.

सध्या रंगभूमीवर अनेक बालनाटकांची मैफल रंगताना दिसते आहे. लेखक-दिग्दर्शक म्हणून या बालनाटय़ांचा अविभाज्य भाग असणारा चिन्मय मांडलेकर वाहिन्यांवरील हरवलेल्या लहानग्यांच्या मालिकांविषयी सांगतो, हिंदी वाहिन्यांवर किमान काही अंशी याची दखल तरी घेतली जाते, पण मराठीतून मात्र लहान मुलांचे विषय आता नाहीसे झाले आहेत जे अत्यंत चुकीचे आहे. सासू-सुनांच्याच मालिका चालतात हा ग्रह वाहिन्यांना झाला आहे. पूर्वी ५.३० ते ७ दरम्यानचा कालावधी खास अशा मालिकांसाठी असायचा जेणेकरून मुलं शाळेतून आली की त्यांना या मालिका पाहता येत. पण आता मात्र हे चित्र कालबाह्य़ झाले आहे. बालनाटय़ाला मिळणारा प्रतिसाद पाहून या आशयाची आज असलेली गरज प्रकर्षांने जाणवते. ‘प्रेक्षकवर्ग मिळेल का’ हा एकमेव संभ्रम वाहिन्यांच्या मनात असतो, परंतु ही दृष्टिकोनातील कमतरता आहे. याबाबत माझे बरेच प्रयत्न सुरू आहेत. आता वाहिन्यांचे डोळे कधी उघडतील त्यावर सारं निर्भर आहे, असे चिन्मय सांगतो.

शिवाय, चिन्मयच्या मते ‘लहान मुलांसाठी नाटक, चित्रपट किंवा मालिका करणे हे कायम जबाबदारीचे काम असते. कारण आपण दाखवलेल्या गोष्टींचा त्यांच्यावर काय परिणाम होईल, त्यांच्या पिढीला ते रुचेल का पचेल का या सगळ्याचा सारासारविचार करावा लागतो.’

‘सोनपरी मालिका करताना मुलांकडून मिळणारा प्रतिसाद मी प्रत्यक्ष अनुभवला आहे. त्यामुळे आजची लहान मुलं त्या गोष्टींपासून दुरावल्याची खंत वाटते. आणि त्याहून जास्त वाईट तेव्हा वाटतं, जेव्हा ही मुलं पालकांसोबत सासू-सुनांच्या मालिका पाहतात. जे त्यांच्या वयासाठी चुकीचं आहे,’ असे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सांगतात. आणि त्यांना आपल्या विश्वातलं असं पाहण्यासाठी कार्टूनपलीकडे काहीच नसल्याने मालिकांमध्ये सुरू असलेलं वरून कौटुंबिक नाटय़ पाहण्यापलीकडे पर्याय उरत नाही. आणि विशेष पालकही याची दखल घेत नाहीत. त्यामुळे आपण त्यांचं परिकथेत रमणारं विश्व हिरावून घेत आहोत, असं मृणाल सांगतात.

तर अभिनेता सुबोध भावे म्हणतो, मुळात काय आशय दाखवायचा आहे हेच लोकांना कळत नाही. सध्या सुरू असलेली दोन-चार बालनाटय़े सोडली, तर वाहिन्यांवर सुरू असलेली कार्टून्सच लोक पुन्हा रंगभूमीवर आणतात. जर वाहिन्यांवर कार्टून दिसत असतील तर लोक नाटय़गृहात का येतील? मुलांची मानसिकता हेरायला हवी, कारण आताची मुलं इंटरनेट आणि मोबाइल वापरणारी आहेत. ती आपल्यापेक्षा चार पावले पुढे आहेत याचे भान सगळ्यांनीच बाळगायला हवे, असे तो म्हणतो. शिवाय आर्थिक धोरणांवर अडून बसलेल्या वाहिन्यांनी काहीच आशय मुलांना दिला नाही, तर मुलांचा कल बदलणार कसा? त्यांचे प्रश्न ते त्यांच्या पद्धतीने सोडवतात, ती सोडवताना असलेली निरागसता, धडपड हे कुणीतरी दाखवायला हवं. आणि लहान मुलांसाठी असलेल्या मालिकाच नाही तर पुस्तक, मासिक, कविता सगळाच आशय खंडित झाला आहे, अशी खंत सुबोध व्यक्त करतो.

‘आम्हाला दैनंदिन मालिकांमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्ही लहान मुलांना आवडेल असा आशय मालिकेत घेतच असतो, पण पूर्णत:च मालिका लहान मुलांवर करायची का याचा निर्णय मात्र वाहिन्यांच्या हातात असतो,’ असं निर्माते विद्याधर पाठारे सांगतात. त्यांच्या मते, प्राइम टाइमची गणिते बदलल्याने वाहिन्या लहान मुलांकडे फिरकत नाहीत. पूर्वीही अशा मालिकांची निर्मिती आम्ही करत होतो, आताही करू, पण वाहिन्यांकडून पहिले पाऊल उचलले जायला हवे. अर्थात मालिका लोकप्रिय होण्यासाठी मुलांना काय आवडेल, कसं आवडेल यांचा अभ्यास करूनच त्याची निर्मिती केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

तर लेखिका सुप्रिया विनोद मात्र ‘प्रेक्षकांनी जागरूक व्हा’ असा सल्ला देतात. त्या सांगतात, मुलांसाठीच्याच नाही तर कोणत्याच विषयात वैविध्य उरलेले नाही. पूर्वी कादंबरी, कथा यांच्या पाश्र्वभूमीवर काही खास भाग बनवले जायचे, शनिवार-रविवारच्या निमित्ताने वेगळे विषय मांडले जायचे. पण सध्या सगळं एकांगी झालं आहे. आणि याला जबाबदार प्रेक्षकच आहेत. त्यांनी सासू-सुनांच्या मालिकांना डोक्यावर घेतल्यानेच त्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रेक्षकांकडून वेगळ्या विषयाची मागणी झाली, प्रतिसाद आला की वाहिन्याही आपला कल बदलतील. शिवाय तंत्रज्ञानात होणारी प्रगती, इंग्रजी आणि इतर भाषेत येणाऱ्या आशयाची सहज उपलब्धता यामुळे मुलांचेही विचार आणि मानसिक कक्षा रुंदावत चालल्या आहेत. याचाही विचार नव्या मालिका आणताना वाहिन्यांनी करायला हवा, असं त्या सांगतात.

लहान मुलांसाठी नवं काही..

लहान मुलांसाठीच्या आशयाबाबत सुबोध कायमच बोलत असतो. लवकरच तो खास लहान मुलांसाठीचा चित्रपट घेऊ न येणार आहे असेही त्याने सांगितले. शिवाय ‘सुबोध भावे’ या त्याच्या यूटय़ूब वाहिनीवर ‘सुबोध दादाच्या गोष्टी’ ही नवी मालिका ४ जानेवारीपासून तो सुरू करत आहे. ही मालिका दर शनिवारी सकाळी ९ वाजता आपल्याला पाहता येणार आहे. नुकतेच या मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचेही सुबोधने सांगितले. तर लहान मुलांसाठी लवकरच नव्या मालिका, नवा आशय आणि नवी धमाल घेऊ न एक नवी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, असे संकेत निर्माते नरेश बोर्डे यांनी दिले.

शहाणपणा शिकवणं बंद करा..

लहान मुलं ही मूर्खच असतात असं ग्राह्य़ धरून येणारा-जाणारा प्रत्येक जण त्यांना शहाणपणा शिकवत असतो. आणि चित्रपट-मालिकांमधूनही हेच होतं. हे शहाणपणाचे बोल आधी बंद करायला हवेत. आणि त्यांना काय हवं, त्यांची काय मानसिकता आहे यांचा विचार निर्माते, दिग्दर्शक, वाहिन्या आणि पालकांनीही करायला हवा.

सुबोध भावे, अभिनेता

वाहिन्यांचा कमकुवत दृष्टिकोन

ऐतिहासिक आशय दाखवल्याने मुलांवर संस्कार होतात असे नाही. आपला इतिहास, त्यातील प्रेरणा त्यांना जरूर द्या. पण त्यांच्या वयात जे पाहणं गरजेचं आहे तोही आशय मुलांना दाखवायला हवा. ‘बोक्या सातबंडे’, ‘दे धमाल’, ‘निशा’ अशा अनेक मालिकांची उदाहरणे आपल्या डोळ्यापुढे आहेत. आज ओटीटीच्या माध्यमातूनही मुलांसाठीचा आशय बनवला जातोय. मग मराठी वाहिन्या याबाबत का मागे आहेत, असा प्रश्न पडतो. लहान मुलांकडे दुर्लक्ष करून वाहिन्या आपला खूप मोठा प्रेक्षकवर्ग गमावत आहेत हे मात्र नक्की.

– चिन्मय मांडलेकर

सासू-सुनांच्या मालिका मुलांसाठी नाहीच. 

हिंदीमध्ये ‘सोनपरी’ मालिका सुरू असताना कायम वाटायचे मराठीतही असा प्रयोग व्हायला हवा. पण कदाचित वाहिन्यांच्या आर्थिक किंवा इतर काही धोरणांमुळे ते शक्य होत नसेल. पण सासू-सुनांच्या मालिका नक्कीच मुलांसाठी नाहीत आणि त्या त्यांना दाखवूही नयेत. त्या मालिका वाईट आहेत असे नाही, पण लहानग्यांना जे दाखवाल ते ग्रहण करण्याची प्रचंड ताकद असते. त्यामुळे अल्लड वयात त्यांनी असा आशय पाहिला तर त्याचा परिणाम निश्चितच त्यांच्या मनावर होतो.

– मृणाल कुलकर्णी

वाहिन्यांनी पुढाकार घ्यावा

लहान मुलांसाठी मालिका किंवा चित्रपट कोणी बनवू शकत नाहीत असे नाही. याआधी मराठीत लहान मुलांसाठीचा दर्जेदार आशय येऊन गेला आहे आणि तो तितकाच लोकप्रिय झाला आहे. परंतु जोपर्यंत वाहिन्यांकडून हिरवा कंदील येत नाही तोवर निर्माते काहीच करू शकत नाही. याला टीआरपीचा महिमा म्हणतात.

– विद्याधर पाठारे, निर्माते

वाहिन्यांना जोखमीचे..

लहान मुलांसाठी सध्या अनेक पर्याय उपलबध आहेत, जे पूर्वी नव्हते. म्हणून दशकभरापूर्वी मराठी आणि हिंदीत लहान मुलांच्या मालिका आल्या. पण वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग ठरलेला असतो, तो काळानुसार बदलतही असतो. त्यामुळे आता लहान मुलांसाठी काही करणे हे कदाचित वाहिन्यांना जोखमीचे वाटत असावे.

– नरेश बोर्डे, निर्माते

पालकच हरवलेत..

एखादी मालिका करताना आर्थिक गणित हे लक्षात घ्यावेच लागते. वाहिन्यांकडून लहान मुलांसाठी तयार केलेला आशय पालक आपल्या मुलांना दाखवतील का? इथून सुरुवात आहे. आणि त्या मालिका चालल्याच नाही तर निश्चितच वाहिन्या त्यांची निर्मिती करणार नाही. सासू-सुनांच्या मालिकेत पालकांना असलेल्या अतिरिक्त अभिरुचीमुळे मुलांनाही तेच पाहावं लागतं. काय वाचावं, काय पाहावं हे मार्गदर्शन आज कुठेतरी कमी पडतंय.

– सुप्रिया विनोद