ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना शुक्रवारी रेखा आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते यश चोप्रा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सन्मानावेळी एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाही उपस्थित होत्या. आशाताईंना पाहून रेखा यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत आणि त्या थेट आशाताईंच्या पायाच पडल्या. यावेळी आशाताईंबद्दल बोलताना नकळत रेखा यांनी भूतकाळातील जखमांवरील खपल्या पुन्हा एकदा काढल्या. ज्यांच्यावर मी प्रेम करते, त्यांच्यापासून दूर पळते, ज्यांच्यावर खूप जास्त प्रेम करते, त्यांच्यापासून तर मैलभर लांब पळते, असं नाही केलं, तर जग मलाच पळवून लावतं, अशा शब्दांत रेखा यांनी आपल्या मनातील दुःख नकळतपणे बोलून दाखवलं.

आशा भोसले आणि यश चोप्रा या दोन व्यक्तींमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचले. हे दोघंही माझ्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाह आहत. आशा ताई अंतर्बाह्य सुंदर आहेत. संपूर्ण मंगेशकर कुटुंबाकडून मी आजवर खूप काही शिकले. सुरूवातील त्यांनी गायलेल्या गाण्यावर नाचायला मी घाबरायचे. पण त्यांच्याकडूनच मी काहीही झाले तरी सतत हसत राहण्याचा गूण शिकले.

या कार्यक्रमाला रेखा यांच्यासोबत जयाप्रदा, पद्मिनी कोल्हापुरे, पुनम धील्लोन, परीणिती चोप्रा उपस्थित होत्या. या अभिनेत्रींसोबतच प्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक, यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा उपस्थित होत्या. अभिनेता जॅकी श्रॉफनेही या सोहळ्याला आवर्जुन उपस्थिती लावली होती. यावेळी कलाकारांनी यश चोप्रा यांच्या आठवणींना नव्याने उजाळा दिला.

पाचव्या यश चोप्रा पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर आशा ताईंनी सर्वांचे आभार मानले. आतापर्यंत लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, रेखा आणि शाहरुख खान यांना यश चोप्रा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/BfRVbHgnIml/