विश्वसुंदरीचा किताब मिळवणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याची प्रशंसा करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात. निळ्या डोळ्यांची ही सुंदरी वयाच्या ४४व्या वर्षीही आपल्या सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडते. १९९४ साली तिने विश्वसुंदरीचा किताब जिंकला आणि त्यानंतर तीन वर्षांनी ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मणी रत्नम यांच्या ‘इरुवर’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले. या चित्रपटाला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिनय क्षेत्रात दोन दशकं पूर्ण केल्याबद्दल, चित्रपटसृष्टीतील तिच्या अभूतपूर्व योगदानाबद्दल अभिनेत्री रेखा यांनी ऐश्वर्यासाठी एक पत्र लिहिले आहे. तिच्या या प्रवासाचा ‘अप्रतिम’ असा उल्लेख रेखा यांनी केला आहे.

बॉलिवूड असो, हॉलिवूड असो, कान्स चित्रपट महोत्सवाचा रेड कार्पेट, अशा प्रत्येक ठिकाणी ऐश्वर्याने तिची विशेष छाप सोडली आहे. तिच्या या कारकिर्दीची दखल घेत प्रसिद्ध ‘फेमिना’ या मासिकेने काही विशेष मुलाखती घेतल्या. करण जोहर, संजय लीला भन्साळी यांसारख्या बड्या कलाकारांनी या मुलाखतीमध्ये ऐश्वर्याचे तोंड भरून कौतुक केले. तर सर्वोत्कृष्ट सन्मान सादर करण्याची संधी एव्हरग्रीन रेखा यांना देण्यात आली होती.

वाचा : ‘दृश्यम’ फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

या पत्रात ऐश्वर्याच्या धैर्य, साहस, सकारात्मक ऊर्जा या गुणांविषयी उल्लेख करताना संकटांवरही मात करत तू एका ताऱ्याप्रमाणे चमकलीस असं त्यांनी म्हटलं. चंद्राप्रमाणे निखळ सौंदर्य असलेल्या अभिनेत्रीने अनेकांच्याच हृदयाचा ठोका चुकवला, या शब्दांत रेखा यांनी ऐश्वर्याचं वर्णन केलं. तर तिने साकारलेल्या अनेक भूमिकांपैकी आराध्याची ‘अम्मा’ (आई) म्हणून सध्या साकारत असलेली भूमिका सर्वोत्कृष्ट असल्याचीही भावना त्यांनी व्यक्त केली. तुझा कलाविष्कार अशाचप्रकारे चाहत्यांपर्यंत पोहोचत राहू दे असं म्हणत त्यांनी ऐश्वर्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.