अभिनेत्री रेखा यांच्या सुरक्षारक्षकाला करोनाची लागण झाली आहे. सुरक्षारक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच मुंबई महानगरपालिकेने रेखा यांचा मुंबईतील बंगला सील केला आहे. त्याचसोबत त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोन असल्याचा फलकही लावण्यात आला आहे.

वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा ‘सी स्प्रिंग’ हा बंगला आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, बंगल्यात दोन सुरक्षारक्षक असतात. त्यापैकी एकाला करोनाची लागण झाली आहे. संबंधित सुरक्षारक्षकावर उपचार सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण परिसराला सॅनिटाइज केलं आहे. याप्रकरणी रेखा किंवा त्यांच्या प्रवक्त्याकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

काही दिवसांपूर्वी आमिर खानच्या स्टाफला करोनाची लागण झाली होती. यामध्ये त्याचे दोन बॉडीगार्ड आणि स्वयंपाकीचाही समावेश होता. आमिरच्या संपूर्ण कुटुंबीयांची करोना चाचणी करण्यात आली आणि सुदैवाने सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. त्याआधी जान्हवी कपूर आणि करण जोहरच्या स्टाफलाही करोनाची लागण झाली होती.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाखांच्याही पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

देशात दोन लाख ८३ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत पाच लाख १५ हजार ३८६ रुग्ण बरे झाले आहेत. मागील २४ तासांत ५१९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.