बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा एक जूना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये रेखा त्यांच्या सहा बहिणींसोबत दिसत आहेत. हा फोटो साधारणपणे २ वर्ष जुना आहे. या बहिणी चेन्नई येथील जीजी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिल्या होत्या. या फोटोमध्ये रेखा यांनी त्यांची आवडती कांजीवरम साडी नेसली आहे. त्यांच्या बाजूला त्यांच्या बहिणी उभ्या आहेत. रेखा यांचा हा फोटो ‘महानती’ सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

रेखा यांच्या बहिणींची नावं जया श्रीधर, रेवती, स्वामिनाथन, कमला सेलवराज, राधा उसमान सैयद, नारायणी गणेशन आणि विजया चामुंडेश्वरी अशी आहेत. ‘महानती’ हा सिनेमा जेमिनी गणेशन यांची तिसरी पत्नी सावित्री यांचा बायोपिक आहे. जेमिनी गणेशन यांना अलामेलू या पहिल्या पत्नीपासून रेवती, कमला, जयलक्ष्मी आणि नारायणी चार मुली होत्या.

रेखा आणि राधा या जेमिनी यांच्या दुसऱ्या पत्नी पुष्पावली यांच्या मुली आहेत. ‘महानती’ सिनेमाची कमला सेल्वराज यांच्याकडून निंदा केली जात आहे. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या वडिलांच्या व्यक्तिरेखेला योग्य तो न्याय देण्यात आला नसल्याचे म्हटले आहे.