04 August 2020

News Flash

पळा पळा कोण पळे तो..

करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय आठवडय़ाभरापूर्वी झाला

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

नैसर्गिक आपत्ती असो किं वा मानवनिर्मित संकट असो.. याचा खूप मोठा फटका चित्रपट व्यवसायाला कायम बसतो. गेल्या काही वर्षांत हिंदी असोत वा मराठी चित्रपट असोत, वर्षभरात किमान चांगल्या मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा निश्चित असतात. हिंदीत तर मोठमोठय़ा निर्मितीसंस्था असल्याने चित्रपट प्रदर्शनाच्या तारखांबरोबरच देशभरातील चित्रपटगृहांशी वितरणासाठीचे करारही झालेले असतात. हे संपूर्ण गणित सध्या करोनामुळे कोलमडून पडले आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेले, मार्चच्या अखेरच्या आठवडय़ात प्रदर्शनासाठी सज्ज असलेले असे हिंदी, मराठी,  हॉलीवूडसह सगळेच चित्रपट रखडले. आताच्या परिस्थितीत पुढे नेमके  काय होणार, याबद्दल एकू णच भाकीत करणे अवघड असल्याने चित्रपट वितरक, निर्माते, चित्रपटगृहांचे मालक सगळेच होणाऱ्या परिणामांना तोंड कसे द्यायचे या विचारात आहेत. मात्र या परिस्थितीमुळे येत्या काही महिन्यांत हिंदीबरोबरच मराठी चित्रपटांचीही प्रदर्शनासाठी एकच झुंबड उडणार आहे आणि त्याचा खूप मोठा फटका मराठी चित्रपटांच्या व्यवसायावर होण्याची चिन्हे आहेत..

करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय आठवडय़ाभरापूर्वी झाला, त्यावेळी ‘एबी आणि सीडी’, ‘विजेता’ आणि ‘इभ्रत’ असे तीन मराठी चित्रपट प्रदर्शित होऊन एकच दिवस झाला होता. प्रदर्शित झाल्या-झाल्या या चित्रपटांना माघार घ्यावी लागली. त्याआधी प्रदर्शित झालेला ‘प्रवास’ चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये टिकू न होता. मात्र आता जेव्हा चित्रपटगृहे पुन्हा सुरू होतील तेव्हा हे तीन चित्रपट पहिल्यांदा पुन्हा प्रदर्शित के ले जातील. या चित्रपटांबरोबरच मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत ‘ईमेल फीमेल’, ‘वाजवूया बँड बाजा’, ‘अजिंक्य’, ‘नेबरहुड’, ‘पांघरूण’, ‘येरे येरे पावसा’, ‘झॉलीवूड’, ‘बस्ता’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ पावटॉलॉजी’, ‘मी वसंतराव’, ‘दगडी चाळ २’ असे पंधरा एक चित्रपट प्रदर्शित होणार होते. मात्र आता या सगळ्याच चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले आहे. सर्वसाधारणपणे एप्रिल-मे महिन्यांचा काळ हा सुटय़ांचा असल्याने त्या काळात सर्वाधिक मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. आता मार्च-एप्रिल मे महिन्यात न प्रदर्शित होऊ शकलेल्या या पंधरा चित्रपटांचा भार हा मे-जून महिन्यांत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवर पडणार आहे. सध्याची परिस्थितीही अशी आहे की करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला आणि वातावरण पूर्वपदावर आले तरी लोक लगेच चित्रपटगृहांकडे वळणार नाहीत. त्यांना चित्रपटगृहांपर्यंत आणण्यासाठी ‘सूर्यवंशी’सारख्या एखाद्या हिट चित्रपटाची गरज भासेल, असे मत जनसंपर्क अधिकारी गणेश गारगोटे यांनी व्यक्त के ले. जून-जुलै महिन्यांत पावसामुळे प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या कमी असते आणि त्या काळात विम्बल्डन, आयपीएल, ऑलिम्पिक सामने अशी एकच गर्दी असल्याने मराठी चित्रपटांच्या व्यवसायावर याचा निश्चित परिणाम होईल, असेही त्यांनी सांगितले.

तर करोनामुळे सध्या सगळ्याच चित्रपटांचे प्रदर्शन महिनाभर तरी लांबणीवर टाकण्यात आले असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे देशात तसेच जगभरातील परिस्थिती कधी पूर्ववत होईल याचा सध्या तरी अंदाज बांधणे कठीण आहे. हिंदीत ‘सूर्यवंशी’ आणि ‘८३’ हे बिग बजेट चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. हे दोन्ही चित्रपट देशातील जास्त चित्रपटगृहात दाखवले जातील. यामध्ये मराठी चित्रपटांच्या वाटय़ाला किती चित्रपटगृहे येणार याचा सर्व निर्माते आणि वितरक विचार करत आहेत, असे चित्रपट वितरक समीर दीक्षित यांनी सांगितले. यातही ओव्हरसीज प्रदर्शन हा कळीचा मुद्दा असल्याचे ते सांगतात. हिंदी-मराठी चित्रपट एकाच तारखेस जगभरात प्रदर्शित केला जातो. हिंदी चित्रपटांना परदेशातून जास्त उत्पन्न मिळते. जर देशातील परिस्थिती पूर्वपदाला आली तरी चित्रपट प्रदर्शित केल्यास पायरसीचा धोका संभवतो. एका महिन्यात परिस्थिती निवळल्यावर किती प्रेक्षक घराबाहेर पडून चित्रपट पाहतील हे सांगणे कठीण आहे, असे त्यांनी सांगितले. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांच्याकडे असलेल्या सात चित्रपटांचे प्रदर्शन अडकले आहे. यामुळे चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांत चढाओढ लागू शकते. ज्या पाच ते सहा हिंदी, मराठी चित्रपटांचे प्रदर्शन रखडले आहे त्यांना प्रथम प्राधान्य देणे आवश्यक असल्याचा मुद्दाही समीर दीक्षित यांनी मांडला.

चित्रपट व्यवसायाने याआधीही अशा अनेक आपत्तींचा अनुभव घेतला आहे. झी स्टुडिओजच्या चित्रपटांना अशा आपत्तींचा सर्वाधिक फटका बसला होता, अशी आठवण चित्रपट वितरक सादिक चितळीकर यांनी सांगितली. २००८-०९ मध्ये जेव्हा स्वाईन फ्ल्यूची साथ पसरली होती, त्यावेळी ‘हाय काय नाय काय’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, सोनाली कु लकर्णी, सई ताम्हणकर अशी मोठी कलाकार मंडळी असूनही चित्रपट त्यावेळी चालला नाही. त्यानंतर २६/११चा हल्ला झाला तेव्हा ‘धुडगूस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यालाही मोठा फटका बसला. नोटबंदीचा निर्णय झाला तेव्हा ‘व्हेंटिलेटर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आणि आता झी स्टुडिओचा ‘पांघरूण’ हा चित्रपट ३ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. या चारही चित्रपटांमध्ये त्यातल्या त्यात नोटबंदीच्या काळात ऑनलाइन तिकीटविक्री शक्य झाल्याने ‘व्हेंटिलेटर’ तरला. त्यावेळी लोकांकडे पैसे होते, पण तांत्रिक अडचणींमुळे त्यांना चित्रपट पाहाणे शक्य नव्हते. आताची परिस्थिती तशी नाही, असं चितळीकर सांगतात. नैसर्गिक आपत्ती किं वा करोना, स्वाईन फ्ल्यूसारखे साथीचे आजार पसरतात तेव्हा त्याचा थेट संबंध हा लोकांच्या जीविताशी असतो. अशावेळी आर्थिक सुबत्ता कितीही असो, त्याचा विचार के ला जात नाही. हे आजार के व्हा थांबतील, त्याचे परिणाम कधी निवळतील, याबद्दल काहीच शाश्वती नसते. आणि अशा आपत्तीतून बाहेर पडल्यानंतर होणारे आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान मोठे असते. लोकांना त्यातून सहज बाहेर पडता येत नाही. अशा परिस्थितीत आत्ताही चित्रपटगृहे कधी सुरू होतील, लोक त्यानंतर लगेच येऊ शकतील का? हे सगळंच अंधारात आहे, असं ते म्हणतात.

मात्र, जेव्हा कधी परिस्थिती निवळेल आणि चित्रपटगृहे सुरू होतील तेव्हा किमान वीस ते पंचवीस मराठी चित्रपटांची प्रदर्शनासाठी गर्दी होईल, असे चितळीकर यांनी सांगितले. मराठी चित्रपटांना हिंदीची स्पर्धा नाही. हिंदीचा वेगळा प्रेक्षकवर्गही आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांची आपापसांतच स्पर्धा असेल, मात्र यावेळी मराठी चित्रपट निर्माते विचारपूर्वक प्रदर्शनाचा निर्णय घेतील, तसा तो घेणे गरजेचेच असल्याचे मतही चितळीकर यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2020 3:18 am

Web Title: releasing hindi marathi film after corona effect abn 97
Next Stories
1 चित्र चाहुल : आधार मालिकांचा..
2 थोडी बेफिकिरी, थोडी सावधानी..!
3 ‘ओटीटीमुळे प्रेक्षकांना विविध पर्याय उपलब्ध’
Just Now!
X