अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद आणि मराठी मनोरंजन सृष्टीकडून पूरग्रस्त सांगली, कोल्हापूर आणि कोकण पट्ट्यातील भागाला आज सकाळी मदत रवाना झाली. आज सकाळी ६ वाजता मुंबईहून मदतीचे साहित्य घेऊन जाणारे ट्रक रवाना झाले आहेत तर सकाळी १० वाजता पुण्याहूनही ट्रक पूरग्रस्त भागांकडे रवाना होणार आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ अभिनेता सुबोध भावेने ट्विट केला आहे.

कोल्हापूर आणि सांगली बरोबरच पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पुराने थैमान घातल्यानंतर मराठी कलाकारांनी स्वत: पुढाकार घेत या भागांमधील लोकांना मदत पाठवण्याचा निर्णय घेतला. स्वत: खर्च करुन तसेच प्रेक्षकांच्या माध्यमातून गोळा केलेलं साहित्य पूरग्रस्तांना पाठवण्यात आलं आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, पिंपरी-चिंचवड या वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेलं १२ ट्रक भरुन सामान पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून पाठवले आहे. मुंबईतील केंद्रामध्ये अनेक कलाकार हे ट्रक भरुन तयार करण्यासाठी मध्यरात्री साडे बारापर्यंत काम करत होते. सुबोधने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सामानाने भरलेले ट्रक दिसत असून अनेक कलाकारही यामध्ये दिसत आहेत.

लोकांकडून मागवण्यात आलेली मदत वेगवेगळ्या सात ठिकाणी गोळा करुन कलाकारांनी त्यांचे व्यवस्थित नियोजन केले. मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईमधील मदत केंद्रांवर अभिनेता सुबोध भावे, जितेंद्र जोशी, संदीप पाठक हे कलाकार स्वत: उपस्थित राहून त्यांनी या सामानाचे पॅकिंग केले. यामध्ये तांदूळ, डाळींची पाकिटं तयार करणे, वस्तूंचे वर्गीकरण करुन त्यांची पाकिटं तयार करणे अशा कामांमध्ये सर्वच कलाकारांनी स्वत:ला झोकून दिले होते. त्याचबरोबरच नाटकांमध्ये बॅकस्टेजवर काम करणाऱ्या अनेकांनी या कामामध्ये मदत केली. प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला लागणाऱ्या सामानाचे वर्गिकरण करुन ते सामान ट्रकमधून पाठवण्यात आले आहे. या सामानामध्ये तांदूळ, गव्हाचं पीठ, डाळी, झाडू, तेल, मीठ, साखर, साडी, चादरी, अंगाचे साबण, कपड्याचे साबण, ब्रश, टूथपेस्ट, दुधाची पावडर, मुलांसाठी वह्या, पेन, पेन्सिल अशा बऱ्याच गोष्टी एका पॅकमध्ये प्रत्येक कुटुंबासाठी कलाकारांनी पाठवले आहेत. हे सामान पूरग्रस्त लोकांना किमान काही दिवस पुरले अशा भावनेने हे सामान पाठवण्यात येत आहे.

दरम्यान अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा कराड येथे छोटासा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नसून चालकासहित सर्वजण सुखरूप आहेत. कृपया अफवा पसरवू नयेत असं आवाहन करण्यात आलं आहे.

पूरग्रस्त भागात या सामानाचे चित्रपट महामंडळ आणि नाट्य परिषदेच्या सदस्यांकडून आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात येणार आहे. तसेच मराठी सिने आणि नाटक सृष्टीच्या माध्यमातून आणखीन मदतही केली जाणार आहे.