पहिल्याच चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या काही अभिनेत्री नंतर मात्र इंडस्ट्रीत फार दिसत नाहीत. अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे संदली सिन्हा. ‘तुम बिन’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आपले सौंदर्य, निखळ हास्य, बोलके डोळे आणि अभिनयाने संदली सिन्हाने केवळ लोकांच्या मनावर राज्यच केले असे नाही तर या चित्रपटामुळे रातोरात तिचे नशीबही चमकले.

पहिल्याच चित्रपटाने संदलीने अशी काही जादू केली की लोक तिच्या अदाकारीने घायाळ झाले. ‘मी चित्रपटसृष्टीत खूप पुढे जाण्यासाठी आलेय’ हाच संदेश जणू संदलीने तिच्या पदार्पणातून दिला होता. निर्माते, दिग्दर्शक अगदी डोळे बंद करून चित्रपटात घेऊ शकतात अशी अभिनेत्री चित्रपटसृष्टीला मिळाली होती. पण, पहिल्या चित्रपटाने प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेली संदली नंतर रुपेरी पडद्यापासून गायब झाली. ‘तुम बिन’नंतर तिला काही चित्रपट मिळाले. मात्र, त्यात ती काही फारशी कमाल दाखवू शकली नाही. त्यामुळे तिला अखेर सहाय्यक भूमिका मिळू लागल्या.

‘पिंजर’ आणि ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेला चांगली पसंती मिळाली. पण सहाय्यक भूमिका असल्यामुळे या चित्रपटांचा तिच्या करिअरसाठी फार काही उपयोग झाला नाही. अखेर बॉलिवूडमध्ये आपला जम बसविण्यात अयशस्वी ठरल्यानंतर तिने २००५ साली व्यावसायिक किरण सालस्कर याच्याशी विवाह केला.

https://www.instagram.com/p/B4MVG8kJ8Fn/

लग्नानंतर संदली जवळपास सात – आठ वर्षं रुपेरी पडद्यापासून दूर राहिली आणि त्यानंतर तिने पुनर्पदार्पण केले. दाक्षिणात्य चित्रपटांमधून ती प्रेक्षकांसमोर आली. पण, तेथेही तिला हवेतसे यश मिळाले नाही. आता संदली चित्रपटांव्यतिरीक्त व्यवसायावर लक्ष केंद्रित करतेय. देशातील सर्वात मोठी बेकरी असलेल्या ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ची ती मालक आहे. संदली आणि तिचा पती किरण सालस्कर यांनी या बेकरीचा पाया रचला. त्यांना दोन मुलंही आहेत.

संदली आणि किरणच्या काही फूड चैन असून ते हॉस्पिटॅलिटी आणि एण्टरटेन्मेंटमध्येही कार्यरत आहेत.