हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्टारडम आणि सुपरस्टार या शब्दांना खऱ्या अर्थाने जगलेला एक अभिनेता म्हणजे राजेश खन्ना. राजेश खन्ना यांची आज सातवी पुण्यतिथी. ‘आराधना’, ‘आनंद’, ‘इत्त्फाक’, ‘दो रास्ते’, ‘बंधन’, ‘डोली’, ‘सफक’, ‘खामोशी’, ‘कटी पतंग’, ‘आन मिलो सजना’, ‘अमर प्रेम’ या आणि अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवण्यात राजेश खन्ना निर्विवादपणे यशस्वी झाले होते. ‘पुष्पा….आय हेट टियर्स’ या त्यांच्या संवादापासून ते अगदी हटके अंदाजात त्यांचं मागे वळून पाहणं आजही अनेकांच्या मनात घर करु आहे. म्हणूनच की काय, अजही राजेश खन्ना यांचा उल्लेख सुपरस्टार म्हणूनच केला जातो. राजेश खन्ना यांनी त्यांच्या अभिनय कारकीर्दीत १६० पेक्षा जास्त चित्रपटांत, जवळपास १७ लघुपटांत काम केले आहे. सलग १५ सुपरहिट चित्रपट देणारे राजेश खन्ना हे एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त माधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत अग्रस्थानी होते.

राजेश खन्ना यांच्या चित्रपटांनी ज्याप्रमाणे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती त्याचप्रमाणे त्यांच्या चाहत्यांचे किस्सेही तितकेच रंजक. एक कलाकार म्हणून राजेश खन्ना नेहमीच चर्चेत राहिले. पण, एक व्यक्ती म्हणूनही त्यांनी आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतला. तेव्हा आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही गोष्टी..

१)
अभिनेता राजेन्द्र कुमार यांनी त्यांचा ‘डिंपल’ हा बंगला राजेश खन्ना यांना विकला होता. राजेन्द्र कुमार यांच्यासाठी अशुभ ठरलेल्या त्याच बंगल्याचे नाव बदलून ‘आशिर्वाद’ असे नाव ठेवले. कालांतराने याच बंगल्यात राहत असताना हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाला पहिला सुपरस्टार राजेश खन्ना. राजेश खन्ना यांनी त्यानंतर अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत लग्नगाठही बांधली होती.

२)
कारकीर्दीच्या असफल दिवसांमध्येही राजेश खन्ना यांचे स्पोर्ट्स कारवर असणारे प्रेम तसुभरही कमी झाले नव्हते. त्यावेळीसुद्धा राजेश खन्ना एम. जी. स्पोर्ट्स कार चालवत असत.

३)
राजेश खन्ना यांना ज्योतिषविद्येत फार रस होता. ते या विषयावर बराच वेळ इतरांशी चर्चाही करत असत.

४)
ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार यांच्या मुलाच्या म्हणजेच आरवच्या ज्योतिषाचे भाकितही राजेश खन्ना यांनी केले होते. त्यासोबत आरवसुद्धा एक सुपरस्टार बनेल असा अंदाजही त्यांनी वर्तवला होता.

५)
राजेश खन्ना अभिनयासोबतच पाककलेतही पारंगत होते. फोडणी दिलेली डाळ ते उत्तम बनवत.

६)
हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता-गायक किशोर कुमार आणि आर. डी. बर्मन हे राजेश खन्ना यांचे खास मित्र होते.

७)
मुमताज आणि राजेश खन्ना यांच्या जोडीने रुपेरी पडद्यावर आजपर्यंत एकही फ्लॉप चित्रपट दिला नाही.

८)
राजेश खन्ना यांनी विविध अभिनेत्रींसोबत स्क्रिन शेअर केली आहे. पण, त्यातही अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांनी जवळपास १५ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

९)
राजेश खन्ना यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘आखरी खत’ या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतही स्थान मिळविले होते.

१०)
राजेश खन्ना यांचे त्यांच्या जावयासोबत म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारसोबत खूपच चांगले नाते होते. राजेश खन्ना अक्षयला ‘बडी’ (मित्र) म्हणून संबोधत असत.