आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायकांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे मुकेश. अभिनेते राज कपूर यांच्या बऱ्याच चित्रपटांमधील गीतं मुकेश यांनीच गायली. या कलाविश्वात त्यांचा राज कपूर यांचा आवाज म्हणूही ओळखलं जातं. ते आज आपल्यात नसले तरीही ‘दोस्त-दोस्त न रहा’, ‘जीना यहां मरना यहां’, ‘कहता है जोकर’, ‘दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई’, ‘आवारा हूं’ आणि ‘मेरा जूता है जापानी’ या गीतांच्या रुपात त्यांचा वावर मात्र आपल्यात आहे, हे खरं.

मुकेश चंद्र माथुर हे त्यांचं पूर्ण नाव. गाण्यात त्यांना बालपणापासूनच फार रुची होती. दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पीडब्ल्यूडीमध्ये नोकरीही केली. कलाविश्वात येत अभिनय क्षेत्रात काम करण्याची त्यांची इच्छा होती. ती इच्छा पूर्णही झाली. ‘माशूका’, ‘आह’, ‘अनुराग’ अशा चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयही केला.

१९४५ मध्ये ‘पहली नजर’ या चित्रपटामधून त्यांनी त्यांच्या पार्श्वगायनाची सुरुवात केली. ‘दिल जलता है तो जलने दे’ हे त्यांचं चित्रपटसृष्टीतील पहिलं गाणं होतं. त्यानंतर त्यांनी एकाहून एक सरस गाणी गायली.

वाचा : RK Studios : आर.के. स्टुडिओविषयीच्या ‘या’ रंजक गोष्टी माहित आहेत का?  

१९७६ मध्ये अमेरिकेत असताना एका स्टेज शो दरम्यानच हदयविकाराच्या झटक्याने मुकेश यांचं निधन झालं होतं. अखेरच्या श्वासापर्यंत या कलाकाराची अखंड स्वरसाधना सुरुच होती, असं म्हणायला हरकत नाही. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी मुकेश ‘इक दिन मिट जायेगा माटी के मोल…’ हे गाणं गात होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीलाच त्यावेळी धक्का बसला होता, अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती.