११ डिसेंबर रोजी बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर, दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून रेमोची पत्नी लिझेल डिसूझाने रेमोच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना लिझेलने रेमोच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. ‘रेमोच्या प्रकृतीमध्ये सुधारणा असून तो सध्या ठिक आहे’ असे लिझेन म्हणाल्या. पुढे त्यांना रेमोला डिस्चार्ज कधी मिळणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी ‘उद्या डॉक्टर रेमोला डिस्चार्ज कधी देणार याबाबत निर्णय घेणार आहेत’ असे सांगितले.

यापूर्वी रेमोचा खास मित्र व कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक अहमद खान याने त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. “रेमोला तातडीने रुग्णालयात नेल्याचं मला फोनवर सांगण्यात आलं होतं. आम्ही सर्वजण चिंतेत होतो पण आता त्याची प्रकृती स्थिर आहे. जो व्यक्ती त्याच्या प्रकृतीबद्दल आणि फिटनेसबद्दल इतकी काळजी घेतो, त्याच्यासोबत असं घडावं म्हणजे तुमच्या आत्मविश्वासालाच मोठा धक्का बसतो” असे अहमद म्हणाला होता.

रेमोने आजवर अनेक रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून काम केले आहे. त्यामध्ये ‘डान्स इंडिया डान्स’, ‘डान्स प्लस’ आणि ‘झलक दिखला जा’ हे शो आहेत. त्याचबरोबर रेमोने काही चित्रपटांचे देखील दिग्दर्शन केले आहे. ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’ आणि ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या चित्रपटांचा समावेश आहे. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमधून रेमोचे नाव चर्चेत आले होते.