प्रसिद्ध चलचित्रकार आणि ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ विजेते व्ही. के. मूर्ती यांचे आज वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. गुरु दत्त यांच्या ‘प्यासा’, ‘साहिब, बिबी और गुलाम’ या चित्रपटांसाठी त्यांनी चलचित्रकार म्हणून काम पाहिले होते. शंकरपुरमयेथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळामुळे सकाळी त्यांची प्राणज्योत मावळल्याचे त्यांची पुतणी नलिनी वासुदेव यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. चित्रपटक्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा १९६९ सालापासून सुरू झालेला ‘दादा साहेब फाळके’ हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळवणारे मूर्ती हे पहिले तंत्रज्ञ होते. २००८ साली त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ‘कागज के फूल’ या पहिल्या भारतातीय सिनेमास्कोप चित्रपटासाठी काम करणारे मूर्ती महान अभिनेते गुरुदत्त यांच्या चित्रपटांतील उत्कृष्ट कॅमेरा कसबीसाठीदेखील ओळखले जातात. त्यांनी साकारलेले ‘चौदवी का चांद’ हे गाणे आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट चलचित्रणाचे उदाहरण आहे. ‘कागज के फूल’ आणि ‘साहिब, बिबी और गुलाम’ या चित्रपटातील कामासाठी त्यांनी ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळवला होता. चार दशके चित्रपटसृष्टीत चलचित्रकार म्हणून काम करणाऱ्या मूर्तींनी अनेक चित्रपटांसाठी काम केले. सुरुवातीच्या काळात ५०च्या दशकात गुरु दत्त यांच्याबरोबर काम केले, नंतर श्याम बेनेगल यांच्या ‘भारत-एक-खोज’ या महामालिकेसाठी काम केले. याशिवाय ‘हूवा हन्नू’ या १९९३ सालच्या प्रसिद्ध कन्नड चित्रपटासाठी काम केले. २००५ साली आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमीच्या अॅमस्टरडॅम येथील पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मैसूर येथे १९२३ साली जन्माला आलेल्या मूर्तींनी एस. जे. पॉलिटेक्निक, बंगळूर येथून चलचित्रणाची पदविका प्राप्त केली. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारी १९४३-४६ ची ही पहिलीच बॅच होती. आपल्या शैक्षणिक वर्षात मूर्तींनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातदेखील भाग घेतला होता. १९४३ साली ते जेलमध्ये गेले होते. स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारे निवृत्तीवेतनदेखील त्यांना मिळत होते. त्यांच्या मागे छाया मूर्ती नावाची मुलगी आहे.