मार्गदर्शक, शिक्षक आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. प्रेमानंद रामाणी हे नाव देशातील कोणत्याही व्यक्तीला नवीन नाही. पोस्टिरिअर लंबर इंटरबॉडी फ्युजन (प्लीफ) या सर्जरीमुळे जगविख्यात झालेले रामाणी यांनी अनेकांच्या पाठीच्या कण्याची दुखणी कमी केली. त्यामुळेच न्यूरोस्पायनल सर्जरीला नवी ओळख प्राप्त करून देणाऱ्या रामाणी यांच्या संशोधनावर व जीवनप्रवासावर आधारित ‘ताठ कणा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

‘ताठ कणा’ या चित्रपटामध्ये अभिनेता उमेश कामत मुख्य भूमिका साकारत असून तो डॉ. रामाणी यांची भूमिका साकारणार असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर उमेशला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

डॉ. रामाणी यांनी लहानपणापासूनच अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत आपलं यश संपादन केलं आहे. विशेष म्हणजे हे करत असताना आपल्या सामाजिक दृष्टीचे भान जपत त्यांनी हजारो रुग्णांच्या वेदना कमी केल्या, अनेकांना जीवनदान दिले. त्यांचा हाच दृष्टीकोन त्यांनी ताठ कणा या पुस्तकात लिहिला आहे.

रामाणी यांचा हाच जीवन प्रवास आणि संशोधन कार्य यावर आधारित ताठ कणा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केलं असून निर्मिती विजय मुडशिंगीकर, करण रावत यांनी केलं आहे.