आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या कथेपासून ते कलेक्शनपर्यंत प्रत्येक गोष्ट पध्दतशीर आणि अभिनव प्रकारे करण्याच्या बाबतीत आमिर खान आग्रही असतो. ‘पीके’ची पूर्वप्रसिध्दी योग्य पध्दतीने झाली आहे. आत्ता हा चित्रपट १९ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यानंतर खरोखरच किती कमाई करतो, याची वास्तव माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी यासाठी आमिरने अमेरिकन ‘रेनट्रॅक’ पध्दतीचा वापर करण्याविषयी निर्माता विधू विनोद चोप्रा यांना सुचवले होते. ‘पीके’ची तिकीटबारीवरील कमाई मोजण्यासाठी ‘रेनट्रॅक’शी करार करण्यात आला असून यापध्दतीचा वापर करणारा ‘पीके’ हा पहिलाच चित्रपट असल्याचे विधू विनोद चोप्रा यांनी जाहीर केले आहे.
‘पीके’ चित्रपटाच्या प्रसिध्दीकार्यक्रमांच्या निमित्ताने मुलाखत देताना आमिरने १००-२०० कोटींचे खोटेनाटे आकडे जाहीर करून लोकांची दिशाभूल करणाऱ्या चित्रपटांवर टीका केली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या शाहरूखच्या ‘हॅप्पी न्यू इअर’ चित्रपटाने तिकीटबारीवरील कमाईचा ३०० कोटींचा टप्पा पार केल्याचे सांगितले जाते. आमिरने मात्र या चित्रपटाचे किंवा शाहरूखचे नाव न घेता या आकडेबाजीवर टीका केली होती. चित्रपटसृष्टीत मोजके निर्माते-दिग्दर्शक आहेत जे आपल्या चित्रपटांच्या कमाईचे खरे आकडे जाहीर करतात. दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि मी नेहमी आमच्या चित्रपटांची जी खरी माहिती आहे तीच समोर ठेवतो. पण, हल्ली शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाला काय प्रतिसाद मिळणार हे लक्षात येत. मग जास्तीत जास्त लोकांना चित्रपटाकडे आणण्यासाठी हे आकडे फुगवून सांगितले जातात, अशी टीका आमिरने केली होती.
हिंदी चित्रपटांसाठी हॉलिवूम्डमध्ये ‘रेनट्रॅक’ची जी प्रमाणित पध्दत आहे त्याचा वापर केला पाहिजे, असे आमिरने म्हटले होते. आपल्याकडे हिंदी चित्रपटांचे वितरक आणि निर्माते दरदिवशीच्या कमाईची आकडेवारी देतात. ही आकडेवारी प्रमाणित मानली जाते. मात्र, ‘रेनट्रॅक’च्या पध्दतीनुसार ही कंपनी देशभरात जेवढी चित्रपटगृहे उपलब्ध आहेत त्यांच्याशी थेट संपर्क साधते. त्या चित्रपटगृहांमधून प्रदर्शित होणारे चित्रपट, त्यांच्या वेळा, प्रत्येक खेळाची झालेली तिकीटविक्री असा सर्व तपशील गोळा ‘रेनट्रॅक’ कडून गोळा केला जातो. ‘पीके’ची तिकीटबारीवरची कमाई मोजण्यासाठी आता ‘रेनट्रॅक’चे सहाय्य घेतले जाणार आहे, असे चोप्रा यांनी सांगितले. हिंदी चित्रपटांमध्ये १०० कोटी-२०० कोटी मोजण्याची सवय आमिर आणि राजकुमार हिरानी यांच्या ‘थ्री इडियट्स’मुळेच झाली. मात्र, ‘थ्री इडियट्स’ने निर्विवाद हे यश मिळवले होते आणि त्या चित्रपटाचा विक्रम मोडणे अजून कोणत्याही चित्रपटाला शक्य झालेले नाही. कमाईचे विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. पण, तुम्ही खरोखर ते मोडून दाखवा.. असे आव्हानही आमिरने चित्रपटसृष्टीतील आपल्या सहकाऱ्यांना केले आहे.