अभिनेत्री रेणुका शहाणे चालू घडामोडी, राजकीय प्रसंग आणि इतर मुद्द्यांवर परखडपणे आपलं मत व्यक्त करत असतात. ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून त्या बेधडकपणे आपली मतं मांडतात. अनेकदा यासाठी त्यांना ट्रोलसुद्धा केलं जातं. पण अशा ट्रोलिंगला न जुमानता बिनधास्तपणे त्या व्यक्त होतात. रेणुका शहाणे ट्विटरवर सर्वाधिक सक्रीय असतात. यावरून एका युजरने तुम्हाला काही काम नाही का असा उपरोधिक प्रश्न विचारला. त्या युजरला रेणुका शहाणेंनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘रेणुका जी, तुमच्याकडे काही काम नाही का? की आजकाल तुम्ही ट्विटरवर काम करत आहात?,’ असा प्रश्न एका ट्विटर युजरने त्यांना विचारला. त्यावर रेणुका म्हणाल्या, ‘का? जे ट्विट करतात त्यांच्याकडे काही काम नसतं असं तुम्हाला वाटत का? आणि जे कोणी ट्विट करतात, मग ते उद्योगपती असो, वैज्ञानिक असो, राजकीय नेता असो किंवा सामान्य व्यक्ती त्यांच्याकडे काही काम नसतं का? ट्विटर अकाऊंट उघडून गप्प बसण्यात काय अर्थ आहे?’

रेणुका शहाणेंचं हे सडेतोड उत्तर नेटकऱ्यांनाही भावलं. ‘बेधडक उत्तर दिलं,’ असं म्हणत अनेकांनी त्यांचं कौतुक केलं.