सामाजिक माध्यमांवर व्यक्त होण्यावरून अनेकदा अभिनेत्रींना ट्रोल केलं जातं. स्वरा भास्कर, सोनम कपूर अहुजा यांच्या व्यक्त होण्यावरून त्यांना बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. अभिनेत्री रेणुका शहाणेसुद्धा मोकळेपणाने विविध विषयांवरील आपली मतं सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत असतात. “ट्रोलिंग हा सध्या व्यवसाय झाला असून स्वतःला सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याला हिणवणं योग्य नाही,” असं त्या म्हणाल्या.

रेणुका शहाणे कायमच सामाजिक माध्यमांवर बिनधास्तपणे आपली मतं मांडत असतात. “कोणतीही चळवळ सुरु करण्यासाठी सामाजिक माध्यमं ही योग्य जागा नाही. पूर्वी सामाजिक माध्यमांवर मोकळेपणाने व्यक्त होता यायचं. एखाद्या व्यक्तीचं मत पटलं नाही तरी त्या व्यक्तीचा अनादर कधीच केला जात नसे.मात्र आता सामान्य परिस्थितीत एखादं मत जरी व्यक्त केलं तरीसुद्धा ते विधान मानलं जातं. अनेकदा लोक मनाला येईल तसं व्यक्त होतात. मला असं वाटतं की मी त्यांच्या समोर नसते म्हणून ते असं विधान करतात. जर मी त्यांच्या समोर असेन तर कदाचित ते अशी विधानं करणार नाहीत.” असं त्या म्हणाल्या.

अभिनय क्षेत्रात असूनसुद्धा रेणुका शहाणे सामाजिक माध्यमांवर राजकारण, प्रचार, देशहित, महिलांच्या समस्या अशा गोष्टींवर व्यक्त होत असतात. मुंबई मिरर वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, ”सुरुवातीला मलाही ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. माझ्या पोस्टवरून लोकांनी केलेलं ट्रोलिंग बघून मला खूप वाईट वाटायचं. पण आता ह्या गोष्टींबद्दल काही वाटेनासंच झाला आहे. मी फक्त काही ठराविक प्रतिक्रियांवरच व्यक्त होते. जे लोक मला ओळखत नाहीत ते मला काहीही कसं बोलू शकतात असं मला नेहमी वाटायचं. मला असंही कळलं की ट्रोलिंगसाठी पैसे दिले जातात. असे ट्रोल्स आता मी सहज ओळखू शकते. एकाबाजूने विचार केला तर ही त्यांची नोकरी आहे त्यामुळे मला आता त्याचाही फरक पडत नाही.”