‘हाच सूनबाईचा भाऊ’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या रेणुका शहाणे यांचा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र सोशल मीडियावर त्या चांगल्याच सक्रिय आहे. समाजात घडणाऱ्या प्रत्येक सामाजिक, राजकीय घडामोडींवर त्या बेधडकपणे व्यक्त होत असतात. चित्रपट, मालिकांच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या रेणुका लवकरच एका नव्या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे त्यांना वेब प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘हम आप के हैं कौन’ या चित्रपटाच्या अभूतपुर्व यशानंतर रेणुका फार कमी चित्रपटांमध्ये झळकल्या. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा हिंदी मालिकांकडे वळविला. मध्यंतरी त्या २०१८ मध्ये ‘व्हॉट द फॉक्स’ या वेब सीरिजमध्ये झळकल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा त्या नव्या सीरिजमध्ये दिसून येणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या या नव्या सीरिजची चाहत्यांमध्ये चर्चा आहे.

रेणुका लवकरच ‘स्टार्टिंग ट्रबल’ या नव्या सीरिजमध्ये झळकणार असून या सीरिजचं दिग्दर्शन अभिनव कमल यांनी केलं आहे. या सीरिजची कथा डॉ. जगदीश चतुर्वेदी यांच्या ‘इन्वेंटिंग मेडिकल डिव्हाइसेस’ या पुस्तकावर आधारित आहे. वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या डॉक्टरांवर आधारित हे पुस्तक असून २०१६ मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं.

विशेष म्हणजे विनोदी अंगाने या सीरिजमधून महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलं आहे. त्यासोबतच रोजच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी या सीरिजमध्ये मांडण्यात आल्या आहेत. “अभिनव आणि जगदीश यांच्यासोबत काम करण्याची वेगळीच मजा असते. सेटवर कायम हसतखेळतं वातावरण असतं. तसंच या सीरिजच्या निमित्ताने मला डॉ. जगदीश चतुर्वेदी यांच्याकडून मेडिकल क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी शिकता आल्या”, असं रेणुका शहाणे म्हणाल्या.

वाचा :  जिद्द.. कधीकाळी बस स्टॉपवर रात्र काढणाऱ्या निलेश साबळेने घेतलं स्वप्नातलं घर !

दरम्यान, ‘स्टार्टिंग ट्रबल’ या सीरिजचे सहा भाग आहेत. या सीरिजमध्ये रेणुका यांच्यासोबत डॉ. जगदीश चतुर्वेदी, कुरुश देबू, अनुष्का, राजेश पीआई, भरत चावला, जुई पवार, आदिती रावल, विक्रांत खट्टा, नेहा पाठक आणि राहुल सुब्रमण्यम हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.