देशभरात सध्या #MeToo चं वादळ घोंघावत आहेत आणि या मोहिमेअंतर्गत कलाविश्वातील बरीच मोठी नावं समोर आली. बॉलिवूडमधील लैंगिक शोषणाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत अभिनेत्री रेणुका शहाणे, रवीना टंडन, स्वरा भास्कर यांचा समावेश असेल.

‘सिंटा’ने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुशांत सिंह यांनी ही माहिती दिली. रवीना टंडनने स्वत: या समितीवर येऊन पीडितांची मदत करण्याची इच्छा व्यक्ती केली. या समितीत दिग्दर्शक अमोल गुप्ते आणि पत्रकार भारती दुबे यांचाही समावेश असेल. त्याचप्रमाणे लैंगिक शोषण प्रतिबंधात्मक समितीच्या वकील आणि मानसोपचारतज्ज्ञांचीही निवड करण्यात येईल. त्याचसोबत एखाद्या कलाकारावरील आरोप सिद्ध झाल्यास त्याच्यासोबत बॉलिवूडमधील कुठल्याच व्यक्तीने काम करू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं ‘सिंटा’कडून सांगण्यात आलं.

‘सिंटा’ने आलोक नाथ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटीशीला उत्तर देताना आलोक नाथ यांनी बलात्काराचे आरोप फेटाळल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे नाना पाटेकर यांनीही ‘सिंटा’ला उत्तर दिल्याचं सुशांतने सांगितलं.