23 September 2020

News Flash

तनुश्री- नाना वादावर रेणुका शहाणेंचं खुलं पत्र

या खुल्या पत्रानंतर रेणुका शहाणे यांनी २००८ मध्ये तनुश्रीच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओसुद्धा फेसबुकवर शेअर केला.

तनुश्री- नाना वादावर रेणुका शहाणेंचं खुलं पत्र

बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्री तनुश्री दत्ता विरुद्ध नाना पाटेकर असा वाद रंगला आहे. तनुश्रीने नानांवर गैरवर्तनाचे आरोप केले असतानाच आता अनेक कलाकारांनी तिची बाजू घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी फेसबुकवर एक खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी तनुश्रीची पाठराखण केली आहे.

रेणुका शहाणे यांनी पत्रात लिहिले-

‘मी नाना पाटेकर किंवा तनुश्री दत्तासोबत काम केलेले नाही. मी ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातही नव्हते. पण तनुश्रीच्या प्रकरणात अनेक असे मुद्दे आहेत, जे मी स्वत:शी जोडू शकते. नाना पाटेकर हे त्यांच्या रागीट स्वभावासोबतच शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दलही ओळखले जातात. गाण्याच्या शूटिंगदरम्यान कदाचित तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा नानांचा उद्देश नसेलही, पण जर ती स्टेप तनुश्रीला खटकत होती, नानांचा स्पर्श तिला खटकत होता, तर त्यात बदल करणं ही नानांसह दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर यांची जबाबदारी नव्हती का? तो स्टेप बदलला असता तर चित्रपटात फार मोठा असा काही फरक पडणार होता का? फक्त एका स्टेपमध्ये बदल केल्याने चित्रपट फ्लॉप झाला असता का? त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांपैकी एखाद्याची मुलगी तनुश्री असती तर तिच्यासोबतही असंच घडलं असतं का? कदाचित स्वत:ची मुलगी असणे आणि मुलीसारखी असणे यात हाच फरक असावा.’

‘एका मुलीच्या विरोधात कदाचित चार पुरुष पुरेसे नव्हते म्हणून तिची गाडी फोडण्यासाठी, तिला घाबरवण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या लोकांना पाचारण करण्यात आलं. तनुश्रीने तथाकथित ‘महाराष्ट्राचा गर्व’ असलेल्या त्या व्यक्तीची माफी मागावी असं त्या राजकीय पक्षाचं म्हणणं होतं. पण एका महिलेसोबत असं अपमानास्पद वागून खरंच महाराष्ट्राला गर्व होईल का?’

‘आता या घटनेच्या परिणामांकडे वळुयात. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोणत्याच पुरुषाचे नंतर काहीच बिघडले नाही. त्यांचा अहंकार जिंकला. पण त्या घटनेचा सर्वाधिक परिणाम कोणावर झाला असेल तर ती व्यक्ती म्हणजे तनुश्री. तिचं करिअर उध्वस्त झालं. एखाद्या व्यक्तीला धमकावणे कधीच योग्य नसते. माझ्या मते तनुश्री खूप धाडसी आहे.’

या खुल्या पत्रानंतर रेणुका शहाणे यांनी २००८ मध्ये तनुश्रीच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओसुद्धा फेसबुकवर शेअर केला. कशाप्रकारे तनुश्रीवर दबाव टाकण्यात आला, तिला धमकावण्यात आलं हे या व्हिडिओतून पाहायला मिळत असल्याचं त्यांनी म्हटलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 1:42 pm

Web Title: renuka shahane writes an open letter on tanushree dutta nana patekar controversy
Next Stories
1 नाना पाटेकर चिंधी अभिनेता-तनुश्री दत्ता
2 तनुश्री-नाना पाटेकर वादाविषयी आशा भोसले म्हणतात…
3 Video : ..जेव्हा सलमान मेहुण्याला देतो वर्कआऊटचे धडे
Just Now!
X