दोन दिवसांपूर्वीच ‘पानी फाऊंडेशन’च्या वॉटर कप स्पर्धेला सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेत अनेकांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे. स्पर्धेतला लोकांचा उत्साह पाहण्यासारखाच आहे. श्रमदानाच्या या कामात आपलाही वाटा असावा याच विचाराने बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार साताऱ्यात पोहोचला. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे बुधवारी सायंकाळी त्याने श्रमदानात सहभाग घेतला. अक्षयने यावेळी गावाच्या कामासाठी पंचवीस लाख रुपयांची मदत जाहीर केली.

उत्तर-पूर्व कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुकचा परिसर दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासून अक्षयच्या आगामी ‘केसरी’ सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे. गेल्या आठवड्यात अक्षयकुमार या गावात आल्यानंतर आपणही वॉटर कप स्पर्धेच्या श्रमदानात भाग घेऊ, असे वचन दिले होते. आपल्या वचनाला जागत त्याने बुधवारी येऊन काही तास श्रमदान केले.

पण तिथे उपस्थित काही तरुण त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होते. यामुळेच अक्षयभोवतीची गर्दी वाढू लागली, शेवटी त्याला तिथून काढता पाय घ्यावा लागला. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील हेही उपस्थित होते. दरम्यान, बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये ‘पानी फाऊंडेशन’च्या कामांना भेट दिली होती. आमिरने ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं. या पद्धतीने काम सुरु राहिल्यास राज्य लवकरच दुष्काळमुक्त होईल आणि याचा फायदा राज्याला आणि पुढच्या पिढीलाही नक्कीच होईल असे तो म्हणाला.