नेटफ्लिक्सची भारतातील पहिली मूळ वेब सीरिज म्हणून ‘सेक्रेड गेम्स’ओळखली जाते. पण याव्यतिरिक्त यातील कलाकार आणि त्यांच्या तोंडी असलेले डायलॉग यामुळे या वेब सीरिजचा पहिला भाग खूपच गाजला. आता सर्वांनाच ‘सेक्रेड गेम्स’च्या सिक्वलची प्रतीक्षा आहे. मात्र #MeToo मोहिमेचा मोठा फटका सिक्वलला बसू शकतो.

‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजसाठी लेखन करणे वरुण ग्रोवर यांच्यावर देखील लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप एका महिलेनं केला आहे. वरुण ग्रोवर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र या आरोपातील गांभीर्य पाहता नेटफ्लिक्स इंडिया नव्या पेचात पडली असल्याच समजत आहे. वरुण ग्रोवर यांच्यावर कारवाई करत ‘सेक्रेड गेम्स’च्या श्रेयनामावलीमधून त्यांचं नाव वगळण्याचा विचार नेटफ्लिक्स करत आहे. पण, जर सुवर्णमध्य निघाला नाही तर ‘सेक्रेड गेम्स’चा सिक्वलच न काढण्याचा शेवटचा पर्याय कंपनीपुढे उरणार आहे.

त्यामुळे एकंदरच ‘सेक्रेड गेम्स २’च्या भविष्यावर आता टांगती तलवार आहे. तेव्हा नेटफ्लिक्स इंडिया कोणता निर्णय घेणार आहे हे पाहण्यासारखं ठरणार आहे. सेक्रेड गेम्स ही विक्रम चंद्रा यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारीत असली तरी ती प्रचंड गाजायचं कारण म्हणजे यामधले सेक्स सीन्स आणि अत्यंत अश्लील भाषेतले संवाद. भारतातल्या सेन्सॉर बोर्डाचे कुठलेही नियम न पाळता केवळ नेटफ्लिक्स या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरून प्रसारण होत असल्याने त्याचा पुरेपूर फायदा घेण्यात आला आहे. या नेबसिरीजवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे, तसेच कोर्टातही दावे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच वादात अडकलेली सेक्रेड गेम्स वरूण ग्रोवर यांच्यावरील लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांमुळे आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांचं तसेच विरोधकांचं सगळ्यांचंच लक्ष काय होतं याकडे लागलेलं आहे.