दीपिका पादुकोन, प्रियांका चोप्रा आणि कंगना रणौत या आजच्या घडीच्या बॉलिवूडमधल्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. बॉलिवूडमध्ये आपलं स्थान मिळवणं या तिघींसाठी नक्कीच सोप्प नव्हतं. पण तिघींमध्ये एक बाब समान होती ती म्हणजे अशी की या तिघांचाही बॉलिवूडमध्ये ‘गॉडफादर’ असा कोणीच नव्हता. मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर या क्षेत्रात टॉपचं स्थान मिळवण्यात या तिघीही यशस्वी झाल्या. आजच्या घडीला त्या अभिनेत्री असल्या तरी आजपासून ठिक १० वर्षांपूर्वी या तिघांचे मार्ग खूप वेगळे होते. त्या तिघीही या १० वर्षांत कशा पुढे आल्यात, त्यांचा प्रवास कसा होता हे जाणून घेऊ..

दीपिका पादुकोन

‘मला चित्रपटाची कथा आवडली पण दिग्दर्शक मला अभिनेत्याच्या तुलनेत खूप कमी मानधन देत होता म्हणून मी चित्रपटाला नकार दिला. माझ्या दृष्टीनं अभिनेत्रीलाही समान मानधन मिळालचं पाहिजे’ असं छातीठोकपणे सांगण्याचा आत्मविश्वास दीपिकानं गेल्या दहा वर्षात मिळवला. आजच्या घडीला बॉलिवूडच्या तिन्ही खानला मागे टाकत ती सुपरस्टारच्या गादीवर विराजमान झाली आहे. सर्वाधिक मानधन घेणारी, यशस्वी चित्रपट देणारी लोकप्रिय अभिनेत्रीचं बिरूद ती मिरवत आहे. ‘राम लीला’, ‘पिकू’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ यासांरखे लागोपाठ हिट चित्रपट तिनं २०१५ ते २०१८ या काळात दिले.

२००९ ते २०१५ या काळात ‘लफंगे परिंदे’, ‘आरक्षण’, ‘बेक अप के बाद’, ‘लव्ह आज कल’, ‘तमाशा’, ‘ये जवानी हे दिवानी’ , ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘रेस २’ अशा अनेक चित्रपटातून ती झळकली यात ‘लव्ह आज कल’, ‘ये जवानी हे दिवानी’ हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. तर इतर चित्रपटांची कामगीरी ही सरासरी होती.
या दशकभरात दीपिकाच्या नावाची चर्चा सुरू झाली ती तिनं सुरू एका मोहिमेपासून. २०१५- २०१६ दरम्यान तिनं खुलपणाने आपण तणावाला बळी पडल्याचं जगासमोर मान्य केलं होते. मानसिक स्वास्थाबद्दल आतापर्यंत कोणत्याही अभिनेत्रीनं समोर येत इतक्या धाडसानं भाष्य केलं नव्हतं. मात्र दीपिका समोर आली आपली दुसरी बाजूही आहे हे देखील तिनं जगाला दाखवून दिलं. पण इतक्यावरच न थांबता मानसिक स्वास्थाविषयी जनजागृती करण्याची मोहिमही तिनं हाती घेतली. आज ती तणावाला बळी पडलेल्या अनेकांसाठी ‘लिव्ह लव्ह लाफ’ ही स्वयंसेवी संस्थाही चालवते. तिथे शेकडो तणावग्रस्तांवर योग्य ते उपचार केले जात आहे.

2017 मध्ये ‘XXX’ चित्रपटातून तिनं हॉलिवूडमध्येही पदार्पण केलं. अनेक आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये सदिच्छादूत म्हणूनही तिनं उपस्थिती लावली. गेल्या वर्षी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिनं अवघ्या फॅशन विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधले. काही महिन्यांपूर्वी ती अभिनेता रणवीर सिंग सोबत विवाहबंधनात अडकली. २०१५ ते २०१८ ही वर्षे तिनं खऱ्या अर्थानं गाजवली. तिच्यासाठी २०१९ हे वर्षे देखील तिच्यासाठी खास ठरणार आहे कारण ‘छपाक’ या चित्रपटातून ती निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.

 

प्रियांका चोप्रा
१९ वर्षांपूर्वी ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावणाऱ्या प्रियांकानं त्यानंतर लगेचच बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कंगना आणि दीपिकापेक्षा बॉलिवूडमध्ये अधिक वर्षे तिनं काढली आहे. मात्र खऱ्या अर्थानं तिच्या करिअरच्या गाडीला वेग आला तो गेल्या दहा वर्षांत.

२००८ साली आलेल्या ‘फॅशन’, ‘दोस्ताना’ चित्रपटामुळे प्रियांकाचं बॉलिवूडमधलं करिअर वेग पकडू लागलं. या सिनेमांच्या यशानंतर प्रियांकानं मागे वळून पाहिलंच नाही. २००८ ते २०१८ या काळात ‘डॉन’, ‘अग्नीपथ’, ‘तेरी मेरी’ कहानी’ , ‘प्यार इम्पॉसिबल’ , ‘कमीने’ , ‘जंझीर’, ‘अंजाना अंजानी’, ‘बर्फी’, ‘मेरी कोम’, ‘सात खून माफ’, ‘क्रिश थी’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘दिल धडकने दो’, ‘जय गंगाजल’ असे अनेक चित्रपट आले. ‘बर्फी’मधल्या तिच्या अभिनयानं तर तिनं सगळ्यांचीच प्रसंशा मिळवली त्यावेळी अनेक पुरस्कार तिच्या वाट्याला आले. या दहा वर्षांत ‘प्यार इम्पॉसिबल’, ‘जंझीर’, ‘तेरी मेरी कहानी’ हे चित्रपट सोडले तर जवळपास सगळेच चित्रपट हिट ठरले.


पण प्रियांकानं स्वत:ला केवळ अभिनय क्षेत्रापुरता मर्यादित ठेवलं नाही. ती निर्मिती क्षेत्रातही उतरली. आपल्या ‘पर्पल पेबल’ या निर्मिती संस्थेद्वारे तिनं अनेक भाषांत चित्रपटांची निर्मितीही केली. या दहा वर्षांत बॉलिवूडमध्ये आघाडीचं स्थान मिळवण्यास ती यशस्वी झाली. ‘क्वांटिको’ मालिकेच्या रुपानं एक मोठी संधी तिच्याकडे चालून आली. या संधीनं प्रियांकाला खऱ्या अर्थानं ‘ग्लोबल स्टार’ बनवलं. २०१५ ते २०१७ या काळात ‘क्वांटिको’नं तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली.

आतापर्यंत बॉलिवूड आणि हॉलिवूडमधले कलाकार एकत्र दिसण्याचा योग तसा कमी आला पण ‘क्वांटिको’च्या निमित्तानं अमेरिकेत स्थायिक झालेली प्रियांका हॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण करण्यास यशस्वी झाली. ‘मेट गाला’ असो किंवा ‘ऑस्कर’ आपल्या आत्मविश्वासानं तिनं आंतरराष्ट्रीय माध्यमांचं लक्ष गेल्या तीन वर्षांत स्वत:कडे वेधलं.

नुकतीच ती अमेरिकन गायक निक जोनास सोबत विवाहबंधतान अडकली. निक हा तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे त्यामुळे ही जोडी वयाच्या अंतरामुळे चर्चेतही आली होती. या वर्षांत तिचे द स्काय इज पिंक आणि इजन्ट इट रोमँटिक हे दोन चित्रपट येत आहे. विशेष म्हणजे ‘ब्युटी विथ ब्रेन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियांकानं आता डेटिंग अॅपमध्येही पैसे गुंतवले आहेत. निर्माती, अभिनेत्री एवढ्यापुरता मर्यादीत न राहता उद्योजिका म्हणूनही तिनं आपली नवी ओळख निर्माण करायला सुरूवात केली आहे.

कंगना रणौत
कंगना ही बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाते पण ही साधीसूधी ‘क्वीन’ नसून बॉलिवूडची ‘बंडखोर राणी’ आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी घरातून पळून ती मुंबईत आली. उपाशी राहून मिळेल ते काम करत ती बॉलिवूडमध्ये तग धरून राहिली. मी कधीही बॉलिवूडच्या तिन्ही खान सोबत काम करणार नाही  अशी भूमिका तिनं घेतली. सलमान, शाहरूख आणि आमिरसोबत काम करणं हे बॉलिवूडमधल्या जवळपास सर्वच अभिनेत्रींचं स्वप्न आहे. मात्र मला यशस्वी होण्यासाठी कोणत्याही खानची आवश्यकता नाही हे ती आत्मविश्वासानं सांगते.

बॉलिवूडमधल्या अनेकांचा ‘गॉडफादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करण जोहरच्या स्टारकिड्सला प्राधान्य देण्याच्या मानसिकतेवर कंगाननं कडाडून टीका केली होती. करणच्या विरोधात ब्र काढण्यास बॉलिवूड स्टार कचरतात पण कंगनानं आपली रोखठोक बाजू मांडली त्यामुळे तिचं विशेष कौतुक केलं गेलं. इतंकच नाही तर हृतिक रोशननं मला फसवलं हे जाहीरपणे सांगायलाही ती कचरली नाही. अगदी गेल्या वर्षीपर्यंत कंगान- हृतिकच्या कथीत प्रेमप्रकरणाची चर्चा होती.

२०१३ साली आलेल्या ‘क्वीन’ या चित्रपटामुळे कंगना बॉलिवूडची राणी ठरली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. त्यानंतर २००८ ते २०१८ या काळात तिचे अनेक चित्रपट आले. ‘काईट्स’, ‘क्रिश ३’, ‘रिव्हॉलवर रानी’, ‘रज्जो’, ‘डबल धमाल’, ‘राझ’, ‘कट्टी बट्टी’, ‘रास्कल’, ‘रंगून’ ‘सिमरण’, ‘तनू वेड्स मनू’, ‘तनू वेड्स मनू रिटर्न’, ‘सिमरण’ असे अनेक चित्रपट आले. मात्र या दहा वर्षांत कंगानं स्मरणात राहिली ती ‘क्वीन’, ‘तनू वेड्स मनू’, ‘तनू वेड्स मनू रिटर्न’, या तीन चित्रपटामुळेच. या तीन यशस्वी चित्रपटानंतर २०१७ मध्ये कंगनाचे ‘रंगून’ आणि ‘सिमरण’ चित्रपटही आले पण हे दोन्ही चित्रपट फ्लॉप गेले. त्यामुळे या वर्षांत आपलं अव्वल स्थान टिकवण्यासाठी कंगनाला अधिक मेहनत करावी लागेल हे नक्की.